Sindhururg Airport : मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवेला हिरवा कंदिल; 9 ऑक्टोबरला पहिलं 'टेक ऑफ'
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळ येत्या 9 ऑक्टोबर पासून नियमित मुंबई ते सिंधुदुर्ग असा विमान प्रवास सुरु होणार आहे. आता मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास काही तासात करता येणार आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळावरुन येत्या 9 ऑक्टोबरपासून नियमित मुंबई ते सिंधुदुर्ग असा विमान प्रवास सुरु होणार आहे. कोकणात मोठ्या संख्येनं देश विदेशातील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कोकणात येत असतात. त्यांना आता मुंबई ते सिंधुदुर्ग हा प्रवास काही तासात करता येणार आहे. तर सण समारंभाचा आनंद लुटण्यासाठी कोकणवासीयांना सुध्दा कोणत्याही खड्ड्याविना अवघ्या काही तासांत घरी जाता येणार आहे. त्यासाठी अलायन्स एअर या विमान कंपनीने मुंबई ते सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे वेळापत्रक आणि तिकीटदर घोषित केले आहेत. ही कंपनी 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशी नियमित विमानसेवा चालवणार आहे.
नागरी उड्डाण महासंचालनालयानं मागील आठवड्यात चिपी विमानतळावरून विमान प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी अलायन्स एअरला एअरोड्रोम लायसन्स दिलं आहे. अलायन्स एअर 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशी नियमित विमान सेवा चालवणार आहे. ही कंपनी चिपी विमानतळावर विमान चालवणारी पहिली देशांतर्गत एअरलाईन्स असेल. केंद्र सरकारच्या रिजनल कनेक्टिव्ही स्कीम अंतर्गत ही सेवा सुरु राहणार आहे. वेळापत्रकानुसार, भूजहून येणारे '9आय 661' क्रमांकाचे विमान मुंबईहून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सिंधुदुर्गसाठी टेक-ऑफ घेईल. हे विमान चिपी विमानतळावर दुपारी 1 वाजता पोहोचेल. विमानाचा (9आय 661) सिंधुदुर्गातून परतीचा प्रवास दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल. हे विमान मुंबईत 2 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.
अलायन्स एअर मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे भाडे 2,520 रुपये, तर सिंधुदुर्ग-मुंबई प्रवासासाठी 2,621 रुपये असेल. एअरलाईन्स कंपनी अलायन्स एअर 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाण सुरु करणार आहे. अलायन्स एअर ही एअर इंडियाची प्रादेशिक उड्डाण उपकंपनी आहे. उड्डाण सुरु झाल्यानंतर अलायन्स एअर ही देशातील पहिली देशांतर्गत वाहक असेल जी कोकण विभागातील ग्रीनफिल्ड विमानतळावरून उड्डाणे सुरु करेल. ही सेवा केंद्र सरकारद्वारे संचालित प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत सुरू केली जात आहे.
दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ ते मुंबई गोवा महामार्गला जोडणारा रस्ता पूर्णपणे खड्डेमय आहे. त्यामुळे जरी मुंबई वरून चिपी विमानतळावर 1.25 मिनिटांत आला तरी महामार्गावर जायला खड्यातून प्रवास करावा लागणार आहे. हा रस्ता योग्य वेळी पूर्ण होईल असं भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे मात्र पावसाअभावी रस्त्याचं काम अडकल्याचं सांगितलंय.
तर एकीकडे विमानतळ सुरु होण्याच्या मार्गावर असून दुसरीकडे विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं यावरून राजकारण सुरु आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्लेचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव द्यावं अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच नाव द्यावं अशी मागणी केली आहे. त्यावरून त्यांनी ट्वीट करून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. "बॅ. नाथ पै हे मोठे नेते होतेच यात वाद नाही. पण चिपी विमानतळाला शिवसेना खासदार यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध करणे या पेक्षा मोठे दुर्दैव नाही! कोण नाव सुचवत आहे, पेक्षा नाव देण्याची मागणी होत आहे, याचे स्वागत केले पाहिजे होते. पण आता ती शिवसेना राहिली नाही! नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांच्या नावाची मागणी करायची आणि सिंधुदुर्गात विरोध करायचा. हेच आताच्या शिवसेनेचे घाणेरडे राजकारण.", असं ट्वीट आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू तसेच शेतमाल उत्पादकांसाठी आठवड्यातून दोनवेळा चिपी येथून 'मँगो कार्गोसेवा' सुरु करण्यात यावी अशी मागणी देवगड पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केली आहे. यासाठी केंद्रीय नागरीहवाई उड्डाणमंत्र्याकडे मागणी नोंदवण्यची सुचनाही त्यांनी केली आहे. येथील पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभापती लक्ष्मण पाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी जिल्ह्यातील आंबा, काजू वाहतुकीसाठी कार्गोसेवा सुरु करण्याची मागणी केली. यासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे, खासदार सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत यांना पाठपुराव्यासाठी पत्रव्यवहार करण्याची सुचनाही त्यांनी केली आहे.