तळकोकणात आदिमानवाच्या पाऊलखुणा, देवगडमधील साळशी गावात कोरीव कातळशिल्प
देवगड तालुक्यातील साळशी गावच्या माळरानावर कोरीव कातळशिल्प आढळून आले आहे. विशेष म्हणजे शिल्पाच्या बाजूला काही अंतरावर भलीमोठी कातळात कोरलेली गुहादेखील आहे.
सिंधुदुर्ग : आदिमानवाच्या पाऊलखुणा आता तळकोकणच्या माळरानावर सापडू लागल्या आहेत. देवगड तालुक्यातील साळशी गावच्या माळरानावर कोरीव कातळशिल्प आढळून आले आहे. पुराणात सप्त पाताळांचा उल्लेख सापडतो. त्यामुळे या ठिकाणी कैक वर्षांपासून प्रगत लोकवस्ती असल्याचे यामुळे समोर येत आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरुन ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड असलेतरी विविध प्राणी, पक्षी आणि काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे कोरली आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स या नावाने ओळखले जाते. संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरुन कोकणातच सापडतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये अशी शिल्पे आढळून येत आहेत. देवगडमधील साळशी गावाच्या माळरानावर सापडलेल्या कातळशिल्पाबरोबरच या गावाला ऐतिहासिक महत्व देखील आहे. हे गाव आदिलशाहीपासून तालुक्याचं ठिकाण म्हणून ओळखलं जात होत. स्वराज्यात सामील झाल्यानंतर या गावाचा दबदबा आणखी वाढला. साळशीच्या माळावर आता आदिमानवाच्या पाऊलखुणांची साक्ष देणारे कातळशिल्प सापडले आहे. विशेष म्हणजे शिल्पाच्या बाजूला काही अंतरावर भलीमोठी कातळात कोरलेली गुहादेखील आहे. त्यामुळे या ठिकाणी आदिमानवाची वस्ती असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
देवगडमधील साळशीत सापडलेल्या या कातळशिल्पामुळे हा अश्मयुगीन ठेवा असू शकतो. त्यामुळे यावर संशोधन होऊन साळशी गाव पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर येण्याची गरज आहे. ही कातळशिल्प साळशी गावातील युवकांना आढळली आहेत.