Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अख्ख गाव सुट्टीवर गेलंय. कोकणची एक आगळी वेगळी प्रथा आहे. नेमकी काय प्रथा आहे ?
कोकणातील एक आगळी वेगळी प्रथा
शेकडो वर्षांची परंपरा जोपासत 'देवपळण' निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील वायंगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ गावाच्या वेशीबाहेर निघाले. त्यानंतर दुपारपर्यंत 1800 लोकवस्तीचा संपूर्ण गावही खाली झालं. त्यामुळे या प्रथेला देवपळण किंवा गावपळण म्हटलं जातं. गावपळणीच्या निमित्ताने संपूर्ण गाव दर तीन वर्षांनी तीन दिवस आणि तीन रात्रीसाठी खाली होते. त्यानुसार सर्व संसार गावाच्या वेशीबाहेर वसले जातात. मालवण तालुक्यातील वायंगणी गावात ही प्रथा शेकडो वर्षापासून जोपासली जात आहे. वायंगणीलगत असलेल्या आचरा आणि चिंदर या दोन गावात तीन वर्षांनी गावपळण होते. मात्र वायंगणी गावात देवपळण आणि गावपळण अशी प्रथा जोपासली जाते. या प्रथे नुसार ग्रामदेवतेचा कौल घेवूनच या गावपळणीची तारीख निश्चित झाली होती. तीन दिवसानंतर देवाचा कौल घेवूनच पुन्हा गावात प्रवेश केला जाणार आहे. तीन दिवसासाठी गावच वेशी बाहेर गेल्याने गावातील शाळा, शासकीय कार्यालयाचे कामकाजही ठप्प राहणार आहे. घरादारांसह सर्व रस्तेही सुनेसुने झाले आहेत.
प्रथेप्रमाणे तीन दिवसांसाठी मुक्काम
वायंगणीचे ग्रामदैवत रवळनाथ चिंदर सडेवाडी येथे प्रथेप्रमाणे तीन दिवसासाठी मुक्काम करतो. त्या लगतच ग्रामस्थ मंडळीही राहुट्या बांधून वास्तव्यास राहतात. रेडी रेवस या सागरी महामार्गावर कालावल पुलाखाली किनाऱ्यालगत राहुट्या बांधून वायंगणी गावातील सर्वजण एकत्रित गुण्या गोविंदाने राहत आहेत. तीन दिवसांसाठी पुरेल एवढा धान्यसाठा व अन्य साहित्य गोळा करून जणू माणसांबरोबर पाळीव प्राण्यांनाही आपल्या सोबतीला आणले आहेत. धार्मिक प्रथा जोपासताना उत्साह व आनंदात तीन दिवस मौजमजाही होते. देवपळणीबाबत पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणेसह सर्व प्रशासकीय यंत्रणाही माहिती देण्यात आली असून त्यांचेही सहकार्य मिळत आहे. वायंगणीच्या या गावपळणीच्या या काळात सर्वजण आनंदाने एकत्रित राहतात. रात्री भजन, फुगड्या एकत्रित येऊन जेवण करणे अश्या पद्धतीने आणि गुण्या गोविंदाने ही सर्व मंडळी राहतात.
संबंधित बातम्या :
- Goa Election Result 2022 : अपक्षांना आम्ही सोबत घेणार, विजयानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया
- Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
- Goa Election Result 2022 Live : भाजप सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेत येणार? अचूक निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा...