Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांसाठी 2022-23 या वर्षासाठी 250 कोटींचा जिल्हा वार्षिक विकास आराखडा प्रास्ताविक करण्यात आला आहे. आराखडा मंजुरीसाठी उद्या (सोमवारी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस मुख्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात सभा होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने जिल्हा नियोजन समितीची सभा उद्या होणार आहे. या सभेमध्ये 2021-22 या वर्षातील 170 कोटीच्या आराखडयातील खर्चाचा आढावाही घेतला जाणार आहे.


जिल्ह्याचा विकास आराखडा 20 जानेवारीपूर्वी शासनाला द्यायचा असतो. त्यापूर्वी नियोजन समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते, विकास कामे, पर्यटन विकास कामे व अन्य विविध विकास कामे तसेच कोव्हिडं प्रतिबंधात्मक योजना यावर चर्चा होणार आहे. या महिन्यातच मंत्रालय स्तरावर अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक घेऊन जिल्याचे आराखडे मंजूर करणार आहेत. तत्पूर्वी जिल्हा नियोजन समितीची सभा होऊन त्यात जिल्हा विकास आराखडा मंजूर होऊन शासनाकडे प्रस्तावित करण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समितीची सभा होणार आहे.


पायाभूत सेवा सुविधांचा समावेश असलेल्या विकास कामांचा समावेश करून 2022-23 या पुढील वर्षासाठी 250 कोटीचा जिल्हा वार्षिक आराखडा तयार करून उद्या होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हा नियोजनची समितीची सभा ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. 


ऑफलाईन पद्धतीने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणाऱ्या सभेला पालकमंत्री उदय सामंत, आमदार, खासदार व मोजकेच अधिकारीच उपस्थित राहणार आहेत. ठराविक जणांनाच परवानगी असणार आहे. तर जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य व इतर सर्व अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑफलाईन सभेला गर्दी न करता नियोजन समिती सदस्य व अधिकाऱ्यांनी ऑनलाईन सभेत सहभागी होणार आहेत.


केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर हे ऑनलाईन पध्दतीने नियोजन समितीच्या सभेला सहभागी होणार आहेत. जिल्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे ऑनलाईन की ऑनलाइन या सभेत सहभागी होणार हे ठरलं नसून जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना ऑनलाईन उपस्थित राहण्याची विनंती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा