Sindhudurg District Bank Election : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व दिसून येत आहेत. एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर भाजपचा विजय, तर आठ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. या निवडणूकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेकांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की, महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागलं होतं. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. अशातच आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून आलं. 


सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी : 



  • सावंतवाडीतून शिवसेनेचे विद्याधर परब विजयी

  • वैभववाडी गटातून भाजपचे दिलीप रावराणे यांचा विजय

  • मालवणमधून महाविकास आघाडीचे उमेदवार व्हिक्टर डांटस विजयी 

  • दोडामार्गमधून शिवसेनेचे गणपत देसाई यांचा विजय

  • कुडाळमधून काँग्रेसचे विद्याप्रसाद बांदेकर विजयी

  • कणकवलीमधून विठ्ठल देसाई विजयी 

  • सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपचे अतुल काळसेकर विजयी

  • सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी

  • औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघातून भाजपचे गजानन गावडे विजयी

  • इतर मागास मतदार संघातून भाजपचे रविंद्र मडगावकर विजयी

  • विमुक्त भटक्या जमाती महाविकास आघाडीचे मेघनाद धुरी विजयी

  • अनुसूचित जाती जमाती मतदार संघामधून महा विकास आघाडीचे आत्माराम ओटणेकर विजयी 

  • वैयक्तिक मतदारसंघातून भाजप प्रणित समीर सावंत विजयी 

  • गृहनिर्माण संस्था मतदारसंघांमध्ये भाजप प्रणीत संदीप उर्फ बाबा परब विजयी 

  • मच्छीमार आणि दुग्ध विकास संस्था मतदारसंघांमध्ये भाजप प्रणीत महेश सारंग विजयी 

  • वेंगुर्ले तालुक्यामध्ये भाजपप्रणीत पॅनलचे मनीष दळवी विजयी 

  • देवगड तालुक्यामध्ये भाजप प्रणित प्रकाश बोडस विजयी 

  • दोन महिला प्रतिनिधी प्रज्ञा ढवण यांचा विजय

  • महाविकास आघाडीच्या नीता राणे विजयी


भाजपचं वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का 


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे पॅनलचं नेतृत्व करणारे सावंत पराभूत झाले आहेत. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पराभव झाला आहे.


कणकवलीतून भाजपचे विठ्ठ्ल देसाई विजयी झाले.  समसमान मतं मिळाल्यानं चिठ्ठी टाकून हा निकाल जाहीर झाला. यात विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे गेल्यावेळी बिनविरोध निवडून आले होते. यंदा मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व दिसत असलं तर सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झाला. याठिकाणी वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक विजयी झाले.


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा