बुलढाणा : बुलढाणा पोलीस  पथकाने (Buldhana Police) शनिवारी रात्री नांदुरा तालुक्यातील तिकोडी येथे देशी विदेशी दारू, शस्त्र व गुटखा जप्त करण्यात यश मिळवलं असून एका जेरबंद करण्यात आले आहे. पोलिस पथकाला गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली होती. नांदुरा तालुक्यातील ग्राम तिकोडी येथे एक व्यक्ती अवैधरित्या विनापरवाना शस्त्र तसेच देशी-विदेशी दारू व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बाळगत व विक्री करत असल्याचं पोलिसांना कळलं होतं.  या माहितीच्या आधारे पथकाने ग्राम तिकोडी येथे असणाऱ्या राजू बडे याच्या जगदंबा किराणा दुकान व घरामध्ये धाड टाकली. त्या ठिकाणी घातक शस्त्र तलवारी व सुरे तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा , देशी विदेशी दारू, तसेच तीन तलवारी व एक मोठा सुरा असा एकूण 45 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून आरोपी राजू बडे याच्याविरुद्ध नांदुरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जिल्ह्यात अनेक ठिकाणी शस्त्र निर्मितीचे कारखाने


जिल्ह्यात अलीकडच्या काळात अवैध शस्त्र बनविणे , विक्री करणे अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. झारखंड दहशतवाद विरोधी पथकाने तर जिल्ह्यात येऊन कारवाई करत काही गावठी पिस्तुल व शस्त्र जप्त करून तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. दिवसेंदिवस बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर , जळगाव जामोद परिसरात अवैध शस्त्र विक्रीचं हब बनत चाललंय. मात्र पोलिसांची मोठी कारवाई होत नसल्याने व या अवैध शस्त्र तयार करणे व विकणाऱ्या व्यवसायाला लगाम लागत नाही. यामुळं परिसरात दहशत मात्र वाढत आहे. 


जिल्ह्यात संग्रामपूर व जळगाव जामोद अवैध शस्त्र तस्करीचे हब


बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर व जळगाव जामोद या तालुक्याला मध्यप्रदेशची सीमा आहे. हा परिसर आदिवासी बहुल असल्याने या परिसरात अवैध शस्त्र मध्यप्रदेशातून तस्करी करून ते विक्री होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्याचे गेल्या वर्षभराच्या पोलीस कारवाईच्या माध्यमातून समोर आलंय. या परिसरात अनेकदा पोलिसांनी सापळा रचून 20 ते 25 हजारात गावठी पिस्तुल विकताना अनेकांना पकडलं आहे. आता तर जिल्ह्यात तलवारी, सुरे अशी घातक शस्त्र चक्क किराणा दुकानात ठेवून विकली जात असल्याने पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. जिल्हा गुन्हे अन्वेशन शाखा नेमकी काय कारवाई करत हे बघणे औत्सुक्याचे असेल.