मुंबई : सलूनबरोबरच ब्युटी पार्लरचा व्यवसाय देखील सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यवसायिकांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील ब्युटी पार्लर व स्पा व्यवसायिकांची दुपारी 1 वाजता ऑनलाईन बैठक आयोजीत करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ब्युटी पार्लर व्यवसायास परवानगी दिली नसल्याने व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे याबाबत बैठक आयोजीत केल्याची माहिती महाराष्ट्र सलून & ब्युटी पार्लर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी दिली आहे.
जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये थोडा बदल करून ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनकडून करण्यात येणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमध्ये सलून व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले आहेत. पण ब्युटी पार्लर व्यवसायालाही परवानगी द्यावी अशी विनंती सोमनाथ काशिद यांनी केली आहे. तसेच सर्व सलून व ब्युटी पार्लर चालकांनी कोरोनाचे नियम पाळून स्वतःची आणि ग्राहकांची काळजी घ्यावी असे अवाहन काशिद यांनी केले आहे.
दरम्यान, जिम बंद ठेवण्यासही नाशिक जिम ट्रेनर अँड ओनर्स असोसिएशनने नकार दिला असून रस्त्यावर उतरण्यासोबतच आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने शनिवारी नवी नियमावली जारी करत कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र, यात जिम पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या लॉकडाऊनमधून अजून न सावरलेले आणि आर्थिक संकटात सापडलेले जिम चालक आणि ट्रेनर हे नाराज झाले आहेत. सरकारविरोधात त्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात एकूण 350 जिम आहेत तर साडेतीन हजाराहून अधिक जिम ट्रेनर आहेत. या निर्णयामुळे त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ येणार आहे. 50 टक्के उपस्थिती आणि दोन डोस झालेल्या व्यक्तींसाठी परवानगी द्या आणि जिम सुरू ठेवा अशी मागणी ते करत आहेत.