Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी 13 जानेवारीला जिल्हा बँकेच्या आरोस प्रधान कार्यालयात निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाच्या प्रांताधिकारी बंदना खरमाळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


अध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर, मनीष दळवी, विठ्ठल देसाई या तिघांची नावे भाजपच्या गोटात चर्चेत आहेत. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तय करणार आहेत याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी सतीश सावत यांचा पराभव करून शिवसेनेला धक्का देत निवडून आलेले विठ्ठल देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व मिळवल्यानंतर आता अध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 13 जानेवारला दुपारी अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण हे स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कणकवलीत झालेल्या संतोष परब हल्ला प्रखरण राज्यभर गाजलं. त्यामुळे जिल्हा बँकेच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. मात्र भाजपनं जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवलं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः लक्ष घालून होते. जिल्हा बँकेत 12 विद्यमान संचालकांना पराभव पत्करावा लागला होता. 


भाजपचं वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का 


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे पॅनलचं नेतृत्व करणारे सावंत पराभूत झाले आहेत. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पराभव झाला आहे.


कणकवलीतून भाजपचे विठ्ठ्ल देसाई विजयी झाले.  समसमान मतं मिळाल्यानं चिठ्ठी टाकून हा निकाल जाहीर झाला. यात विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे गेल्यावेळी बिनविरोध निवडून आले होते. यंदा मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व दिसत असलं तर सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झाला. याठिकाणी वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक विजयी झाले.


दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व दिसून येत आहेत. एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर भाजपचा विजय, तर आठ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेकांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की, महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागलं होतं. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. अशातच आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून आलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व; विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा