Shravan Somvar Vrat 2022 : आज श्रावणातील पहिला सोमवार; राज्यभरातील मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी, वाचा अपडेट एका क्लिकवर
Shravan Somvar Vrat 2022 : आज श्रावण (Shravan 2022) महिन्यातला पहिला सोमवार.. यामुळे भाविकांनी राज्यभरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच गर्दी केलीय. राज्यभरातील अपडेट वाचा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Shravan Somvar Vrat 2022 : आनंदाचा, उल्हासाचा, भक्तीचा श्रावण महिना सुरु झाला आहे. आज श्रावण (Shravan 2022) महिन्यातला पहिलाच सोमवार आहे. श्रावणातले सोमवार हे विशेष महत्वाचे समजले जातात. श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करायची धार्मिक परंपरा आहे. पहिल्या सोमवारची शिवामूठ तांदूळ आहे. या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेली माहिती जाणून घेऊयात.
श्रावणी सोमवार व्रत :
श्रावणी सोमवार या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असावा. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘ हा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करावी.
अशी करावी पूजा :
Nagpur : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची मांदियाळी
नागपूरः पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त नागपुरातील शिव मंदिरात भाविकांची गर्दी आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे प्रार्थनास्थळांवरही निर्बंध असल्यामुळे भाविकांना मंदिरात दर्शन घेता आले नाही. मात्र यंदा कोरोनाची लाट ओसरल्याने महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांमध्येही उत्साह आहे. शहरातील महाल येथील कल्याणेश्वर मंदिर, फुटाळा येथील तेलंगखेडी शिवमंदिर, सुराबर्डी येथील शिवमंदिर आणि मानकापूर येथील प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
बेळगाव : श्री कपिलेश्वर मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी
पहिल्या श्रावण सोमवार निमित्त बेळगावातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे महादेवाला विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती करून भक्तांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. श्रावणी सोमवार निमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात पूजा साहित्य आणि अन्य दुकानं थाटण्यात आली. श्री कपिलेश्वर मंदिराचे पौराणिक महात्म्य असून काशी यात्रा करून आल्यावर श्री कपिलेश्वराचे दर्शन घेतल्यावर काशी यात्रेची पूर्तता होते असं मानले जातं. शेकडो वर्षापूर्वीचं हे मंदिर असून श्री कपिल ऋषींनी या मंदिराची स्थापना केली अशी अख्यायिका आहे. दिवसभर मंदिरात दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती.
























