डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका, कन्नडीगांच्या उन्मादावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. मी स्वत: बेळगावात जाणार आहे. मला तिथून असंख्य फोन येत आहेत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

मुंबई : बेळगावात मराठी माणासांवर सुरु असलेल्या दडपशाहीविरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
बेळगावात सुरु असलेली दडपशाही एका राजकीय पक्षाचा किंवा सरकारचा विषय नाही. राज्यातून एक सर्वपक्षीत शिष्टमंडळ तात्काळ बेळगावला पाठवायला हवं. असं नाही केलं तर सांगली कोल्हापूरमधील असंख्य नागरिक बेळगावात शिरतील. त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. मी स्वत बेळगावला जायचा प्रयत्न करतोय. मी बेळगावात जाऊ शकतो. तिथल्या असंख्य लोकांचे मला फोन येत आहेत. बेळगाव हा या देशाचा भाग आहे. आम्ही मराठी माणसे तिकडे जायचं म्हटलं की आम्हाला बंदुका दाखवतात. आमच्याकडे बंदुका नाहीत का? असं संजय राऊत यांनी म्हटलं.
डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका
कर्नाटकातील दडपशाही विरोधात आवाज आम्ही उठवू. मात्र त्यांनी कठोर पावलं उचलायला आम्हाला भाग पाडलं तर ती पावलं सरकारी नसतील. ती पावलं राजकीय असतील. मग डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका, असा इशारा कन्नडीगांच्या उन्मादावर संजय राऊत यांनी दिला आहे. कर्नाटक सरकार बेळगावमध्ये अतिक्रमण करत आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत काही काम करता येणार नाही. तिथे न्यायालयाचा अवमान केला जातोय.
महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला, दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद
महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा चिघळला आहे. कर्नाटकमधील व्यक्तीकडून महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही घटना घडली. त्यानंतर आता दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारवर हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला आणि गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली. त्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन करत कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं.
काल काय घडलं होत?
काल दुपारी बेळगावमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर हल्ला केला. हा हल्ला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. काही कार्यकर्ते शिवसेनेच्या शाखेकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी एकट्या शिवसैनिकाने कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. यानंतर मराठी भाषिकांनी त्याठिकाणी निदर्शनं करून कर्नाटक प्रशासन आणि कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी केली.



















