(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कालची गोष्ट कालच झाली, 'त्या' प्रकरणावर बोलण्यास उद्धव ठाकरेंचा नकार
Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले.
Uddhav Thackeray : आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मला म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. आज याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता ठाकरेंनी त्याला बगल दिली. कालची गोष्ट कालच झाली असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला.
गीतातून जय भवानी हा शब्द काढून टाकणार नाही
उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं शिवसेना ठाकरे गटाच्या गीतातून जय भवानी हा शब्द काढून टाकावा अशा संदर्भात निवडणूक आयोगाची नोटीस आली होती. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जय भवानी हा शब्द आम्ही काढणार नाही. तुम्हाला काय कारवाई करायची ते करा असेही ठाकरे म्हणाले. आमच्या गीतातून धार्मिक प्रचार होत असेल, तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी धार्मिक प्रचार करणाऱ्या वक्तव्यावर आधी कारवाई करावी असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल तुमच्या मनात एवढा आकस का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना केला. जय भवानी जय शिवाजी ही आमची घोषणा आहे. तुमची हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही.
नरेंद्र मोदी हे जर बजरंगबली बोलू शकतात तर आम्ही जय भवानी का नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे जर बजरंगबली बोलू शकतात तर आम्ही जय भवानी का म्हणू शकत नाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उपस्थित केला. त्यामुळं जय भवानी हा शब्द आम्ही काढणार नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली. मोदी-शाह यांना वेगळे नियम लागू होतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भवानी माता कुलदैवत ,त्याचे स्मरण करणं यात गुन्हा काय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे उघड-उघड धार्मिक प्रचार करतात. मग त्यांना का विचारना होत नाही. त्यांच्यासाठी काही वेगळे नियम आहेत का? असा सवालबी यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या: