यापुढे दिल्लीच्या तख्तासंबंधी विचार करताना शिवसेनेची भूमिका महत्वाची: खासदार संजय राऊत
Shivsena Foundtion day : राज्याच्या राजकारणात प्रमुख भूमिका बजावणारी शिवसेना आता दिल्लीच्याही राजकारणात महत्वाची भूमिका बजावेल असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.
मुंबई : 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' हे शिवसेनेच्या भविष्यासाठीच लिहिलं आहे. या पुढे दिल्लीच्या तख्तासंबंधी विचार करताना शिवसेनेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असा सूचक इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. आज शिवसेनेचा 55 वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने त्यांनी बोलताना हे वक्तव्य केलं.
खासदार संजय राऊत म्हणाले की, "शिवसेनेच्या स्थापनेवेळी हा पक्ष मुंबई आणि ठाण्यापुरताच मर्यादित असणार असं अनेकजण म्हणायचे. आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमत्री आहे. शिवसेनेनं राज्याची सीमा ओलांडून दिल्लीपर्यंत धडक मारली आहे. राज्याच्या राजकारणात प्रभाव टाकणाऱ्या शिवसेनेचा दिल्लीतील आवाज कायमच बुलंद राहिलाय. त्यामुळे यापुढे देशाच्या राजकारणात शिवसेना महत्वाची भूमिका बजावेल."
हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेचे जिव्हाळ्याचे आहेत असं सांगत संजय राऊत म्हणाले की, "हिंदुत्व म्हटलं तर शिवसेनेचा चेहरा समोर येतोय तर मराठी माणसालाही शिवसेना आपली वाटते. हेच बाळासाहेबांचं स्वप्न घेऊन शिवसेना वाटचाल करत आहे. शिवसेनेचं मराठीपण जसं तळपणाऱ्या तेजासारखं आहे तसंच हिंदुत्वाचं कवचही बुलंद आहे. शिवसेनेनं आपला रंग कधी सरड्याप्रमाणे बदलला नाही."
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "गेल्या एक वर्षाहून अधिक काळ दिल्लीत शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आता केंद्र सरकारने दोन पावले पुढे यावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा."
शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा होणार
मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा आता 55 वा वर्धापन दिन साजरा होत असून, यंदाही वर्धापन दिनावर कोरोनाचे सावट आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायमच आहे. याचमुळे शिवसेनेने यंदाही पक्षाचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. आज संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी बोलणार आहेत. आयोध्या राममंदिर, महापालिका निवडणूक आणि शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री आजच्या भाषणात बोलणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :