Shivsena : शिंदे गटाचंही चिन्ह ठरलं? तुतारी, गदा आणि तलवारीला प्राधान्य, पक्षाच्या नावात बाळासाहेबांचा समावेश
Election Symbols : शिवसेनेने निवडणूक आयोगाला तीन पर्याय दिल्यानंतर आता शिंदे गटाकडूनही तीन चिन्हांच्या पर्याय दिला जाणार असल्याची माहिती आहे.
मुंबई: हिंदुत्ववादी विचारांना पुढे घेऊन जात असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे गटाने काही आक्रमक चिन्ह घेता येईल का याची आजच्या बैठकीत चाचपणी केल्याची माहिती आहे. त्यामध्ये तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांना शिंदे गटाकडून प्राधान्य दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत शिंदे गट या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून सोमवारी एक परिपत्रक जारी करुन निवडणूक चिन्हावर आपली भूमिका मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये पक्षाच्या चिन्हाबाबत पक्षाच्या कार्यकारिणीने निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
शिंदे गटाकडून तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांना प्राधान्य देण्यात आलं असून याबाबत उद्या निवडणूक आयोगाला माहिती देण्यात येणार आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपल्या निवडणूक चिन्हासाठी उगवता सूर्य, त्रिशूळ आणि मशाल या चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच पक्षाच्या नावासाठी तीन पर्याय देण्यात आले असून त्यामध्ये बाळासाहेबांच्या नावाचा समावेश आहे.
शिंदे गटाच्या पक्षाच्या नावातही बाळासाहेब या नावाचा समावेश असावा असा निर्णय झाल्याची माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे नाव पुढे घेऊन जाण्याचा मानस शिंदे गटाचा असल्याचं स्पष्ट आहे.
शिवसेनेचे चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सोमवारपर्यंत आपल्या नव्या चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने तीन पर्याय देण्यात आले होते. त्यानंतर आता शिंदे गटाकडूनही त्यासंबंधी हालचाल करण्यात येत आहे.
तुतारी अग्रक्रमावर
ज्या तुतारीने रणशिंग फुंकलं जातं त्या तुतारीला शिंदे गटाचं प्राधान्य असल्याचं समजतंय. आज झालेल्या शिंदे गटाच्या बैठकीत आमदार आणि खासदार उपस्थित होते. या सर्वांनी तुतारी या नावाला अग्रक्रम दिल्याचं समजतंय. त्यामुळे येत्या अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिंदे गटाकडून तुतारी या चिन्हासह उमेदवार उतरल्यास त्याचं आश्चर्य वाटायला नको.
तलवार आणि गदा यासंबंधी अद्याप निर्णय झाला नसला तरी उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज आपले चिन्ह सर्वांसमोर आणलं आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, आपलं चिन्ह तर समोर आलं आहे, पण विरोधी गटाचं चिन्ह मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून आता चिन्हावर खलबतं करण्यात आली असून तीन नावांना प्राधान्य देण्यात आलं आहे.