संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यानं राज्यभरातील डॉक्टर्स नाराज; खुद्द उद्धव ठाकरेंची मध्यस्थी अन् गैरसमज दूर
Sanjay Raut Controversial Statement: संजय राऊतांच्या वक्तव्यानं राज्यभरातील डॉक्टर्स आणि संघटना नाराज झाल्यामुळे खुद्द उद्धव ठाकरेंना मध्यस्थी करुन गैरसमज दूर करावी वागली आहे.

Sanjay Raut Controversial Statement: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता संजय राऊत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. खासदार संजय राऊतांनी कोरोनाच्या काळात (Corona Virus) राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीतून पळून गेल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मात्र संजय राऊतांच्या वक्तव्याचं पडसाद उमटले. राऊतांच्या वक्तव्याचा राज्यातील विविध डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांनी निषेध केला. पण राऊतांच्या वक्तव्यावरुन नाराज झालेल्या डॉक्टरांची थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी समजूत काढली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना डॉक्टरांबाबत एक वक्तव्य केलं. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. त्यानंतर या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. राज्यातील विविध डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांनी या वक्तव्याचा निषेध केला. आयएमएसह प्रमुख संघटनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली भूमिका मांडली. त्यानंतर हा विषय थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचला आणि खुद्द ठाकरेंनाच डॉक्टरांची समजूत काढावी लागली.
काय म्हणाले होते संजय राऊत?
कोरोना काळात डॉक्टर्स आणि नर्स देवदूत ठरले. त्यांनी स्वतःचा जीव, कुटुंबाची पर्वा न करता अनेकांना जीवनदान दिलं. पण याच डॉक्टरांबाबत बोलताना संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं, त्यामुळे राज्यभरातील डॉक्टर्स आणि संघटना नाराज झाल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना 'कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले असं वक्तव्य केलं होतं.
राऊतांचं वक्तव्य फारच वेदनादायी; कल्याण आयएमए अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्याकडून खंत व्यक्त
खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य फारच वेदनादायी होतं. पहिल्या लाटेत कल्याण डोंबिवलीतील खाजगी डॉक्टर्स आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील डॉक्टर्स ठाकरे सरकारसोबत अगदी खांद्याला खांद्या लावून काम करत होते. त्यानंतर हे राऊतांचं वक्तव्य समोर आल्यानंतर आम्हाला मात्र खूप वेदना झाल्या आहेत. याचा रोश आम्ही कल्याणमधील ठाकरे गटाचे स्थानिक नेते विजय साळवी यांच्याकडे मांडला आणि ही बाब उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करत डॉक्टरांची समजूत काढली. तसेच, हे सर्व गैरसमजातून झालं आहे. आम्हाला डॉक्टर आणि नर्स यांच्याबद्दल नितांत आदर आहे. कोरोनावर मात मी मुख्यमंत्री असताना डॉक्टर आणि नर्स यांच्या साहाय्यानं करू शकलो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि आमची समजूत काढली. त्यानंतर या वादावर आता पडदा पडल्याचंही कल्याण आयएमए अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
