'राज्यकर्त्यांना माफी मागण्याचे व्यसन जडले', केंद्र सरकारवर शिवसेनेचा हल्लाबोल
राज्यकर्त्यांना माफी मागण्याचे व्यसन जडले आहे, अशा शब्दात शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून नागालॅण्डमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं केंद्र सरकारला घेरलं आहे
मुंबई : पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना देशाची माफी मागून तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले. तोपर्यंत 800 च्या वर शेतकऱ्यांचे बळी सरकारने घेतले, पण पंतप्रधान मोदींनी माफी मागितली व विषय संपवला. तशी गृहमंत्री अमित शाहांनीही माफी मागितली आणि नागालॅण्डमधील प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. राज्यकर्त्यांना माफी मागण्याचे व्यसन जडले आहे, अशा शब्दात शिवसेनेनं (Shiv Sena) केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून नागालॅण्डमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं केंद्र सरकारला चांगलंच घेरलं आहे.
अग्रलेखात म्हटलं आहे की, गुन्हा करायचा, लोकांचे बळी घ्यायचे व प्रकरण अंगावर शेकले की माफी मागायची. मग अशी माफी मागून सुटका करून घेण्याची सवलत इतरांना का मिळू नये? ईडी, सीबीआय, एनसीबीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा खोटे गुन्हे घडवून अनेकांचे जीवन संपवीत आहेत.
तरुण पोरांना फसवून तुरुंगात टाकले
लेखात पुढं म्हटलं आहे की, 'क्रूझ ड्रग्ज' पार्टीचे खोटे प्रकरण एनसीबी अधिकाऱ्यांनी रचले व तरुण पोरांना फसवून तुरुंगात टाकले. त्यांना जामीनही मिळू दिला नाही. नागालँडमध्ये निरपराध्यांना गोळय़ा घातल्या गेल्या तसे इतर प्रकरणांत निरपराध्यांना चौकशीत अडकवून तुरुंगात सडवले गेले. या सर्व प्रकरणांची 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी' कधी होणार? नागालँडमध्ये सुरक्षा दलांनी घातक चूक केली. त्या चुकीस केंद्र सरकारने माफी दिली. महाराष्ट्रात अशा चुका व गुन्हे केंद्रीय तपास यंत्रणा रोज करीत आहेत. फक्त नागालँडमध्ये जशी संतप्त जनता रस्त्यावर उतरली तसे इतरत्र घडले नाही. मात्र संयमाचा बांध तुटला की तेही घडेल. राजाने मारले तर जनता न्याय करते हे लिबियासह अनेक देशांत दिसले आहे, असं देखील लेखात म्हटलं आहे.
चार ओळींचा खेद व्यक्त करून संपवावे असे हे प्रकरण नाही
नागालँडमध्ये निरपराध्यांना गोळ्या घातल्या गेल्या तसे इतर प्रकरणांत निरपराध्यांना चौकशीत अडकवून तुरुंगात सडवले गेले. या सर्व प्रकरणांची 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी' कधी होणार? असा सवाल देखील शिवसेनेनं केला आहे. 'चुकीला माफी नाही' असे नेहमीच सांगितले जाते, पण ते सामान्यांच्या बाबतीत. पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर दाद कुणाकडे मागायची, असाही सवाल केला जातो. तो नागालँडच्या अमानुष प्रकाराबाबत खराच आहे. सीमेवरील राज्य नागालँडमध्ये सुरक्षा दलाने अतिरेकी समजून 13 नागरिक व एका जवानास ठार मारल्याच्या घटनेने देश सुन्न झाला आहे. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानात उमटलेच, पण संसदेच्या दोन्ही सभागृहांतही उमटले. तेव्हा आपले सन्माननीय गृहमंत्री अमित शाह यांनी झाल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करून या अमानुष घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. फक्त चार ओळींचा खेद व्यक्त करून संपवावे असे हे प्रकरण नाही. 13 निरपराध नागरिक व एक जवान नाहक मारला गेला आहे. त्यांच्या हत्येचे पातक सरकारच्या डोक्यावर आहे, असं सामनामध्ये म्हटलं आहे.