प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतले, आमदार बांगर यांचा आरोप
Prakash Yashwant Ambedkar : शिवसंपर्क अभियानादरम्यान जवळा बाजार येथील सभेत संतोष बांगर यांनी प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केला आहे.
Prakash Yashwant Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीमध्ये एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. ते जवळा बाजार येथील शिव संपर्क अभियान दरम्यान आयोजित सभेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्व बौद्ध समाजाने वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं आणि तिकडे प्रकाश आंबेडकर यांनी एक हजार कोटी रुपये घेतले. नेहमीच वादग्रस्त वक्तव्या करणारे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा नवा वाद निर्माण केला आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बांगर यांच्या आरोपावर प्रकाश आंबेडकर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिव संपर्क अभियान राबविण्यासाठी राज्यातील सर्व शिवसेना खासदार व आमदारांची बैठक घेतली होती. शिव संपर्क अभियान राबवून नवीन शिवसैनिक जोडण्यासाठी आणि पक्ष विस्तार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला निरीक्षक सुद्धा नेमलेले आहेत. हिंगोली जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून कोल्हापूर लोकसभेचे खासदार संजय मंडलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मंडलिक यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक सर्कलनुसार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शुक्रवारी शिव संपर्क अभियानाचा कार्यक्रम हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये संजय मंडलिक यांच्यासह शिवसेना आमदार संतोष बांगर यांची सुद्धा उपस्थिती होती. या सभेला संबोधित करताना वादाच्या भोवऱ्यात असणारे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मागील निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप आमदार बांगर यांनी केला आहे. सर्व बौद्ध समाजाने वंचित बहुजन आघाडीला मोठ्या संख्येने मतदान केले. कोणत्याही पक्षाचा माणूस वंचितच बटन दाबून वंचितला मतदान करत होता. आणि तिकडे प्रकाश आंबेडकर यांनी एक हजार कोटी रुपये घेतले आणि हे पैसे घेऊन प्रकाश आंबेडकर हेलिकॅप्टरने सभास्थानी पोहोचू लागले. मग हेलिकॅप्टर आलं कुठून असा गंभीर आरोप संतोष बांगर यांनी केला आहे.