गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार, आज पत्रकार परिषद घेऊन जागांबाबत माहिती देणार : संजय राऊत
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रावादीने काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आघाडी झाली नाही. त्यामुळे गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
Goa Election : गोव्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आघाडी झाली नाही. गोव्याच्या स्थानिक काँग्रेसला ते पेललं नाही, त्यांना आमच्या शुभेच्छा असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान, आज गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेत किती जागांवर लढणार ते निश्चित केले जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी लढाई होईल असे वाटत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आम्ही गोव्यात सर्व जागा लढवणार नाही. आम्हाला आमच्या मर्यादा माहित आहेत. आम्हाला काय करायचे ते माहित असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. गोव्याच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बोलणे झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे सध्या गोव्यात आहेत. मी आता गोव्यात जात आहे. आज तिथ आमची बैठक होईल. त्यामध्ये आम्ही कोणकोणत्या जागांवर निवडणूक लढवायची हे निश्चित करु. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपल्याला माहिती देऊ असे राऊत यांनी यावेळी सांगितले. गोव्यात जर खिचडी बनत असेल तर त्यात कडीपत्ता, हळद अश्यापैकी काही न काही शिवसेना किंवा राष्ट्रवादी जरूर असणार. गोव्यात तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषीत करणार का? असेही यावेळी राऊत यांन विचारण्यात आले. यावेळी राऊत म्हणाले की, आम्हाला आमच्या मर्यादा आहेत. तृणमूल काँग्रेस, आम आदमी तिथे स्रव जागा लढवणार आहे म्हणून ते त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषीत करणार आहेत असे राऊत यावेळी म्हणाले. राजकारणात सध्या नित्तीमत्ता, मूल्ये राहिली नाहीत. राजकारणात खाली कोसळत असल्याचे राऊत म्हणाले. तसेच गोव्यात पर्रिकरांचा सन्मान राखला पाहिजे असे देखील ते म्हणाले.
गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. एकूण 40 जागांसाठी ही मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर 10 मार्चला निवडणुकांचा निकाल लागमार आहे. 2017 गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 2017 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. पण भाजपने काँग्रेसचे अनेक आमदार फोडले होते आणि सरकार स्थापन केले होते. या निवडणुकीत मतदानाचे टक्केवारी ही 83 टक्के होती. या निवडणुकीत काँग्रेसने 36 जागांवर निवडणूक लढवली होती. यात काँग्रेसने सर्वाधिक 17 जागा जिंकल्या होत्या. ज्या बहुमतापासून फक्त 4 जागा दूर होत्या. तर भाजपने सुद्धा 36 जागांवर निवडणूक लढवली होती. पण 13 जागांवर भाजपला विजय मिळवता आला होता. गोवा फॉरवर्ड पार्टी जीएफपी ही 4 जागांवर निवडणूक लढली होती आणि 3 जागा जिंकली होती. तर आम आदमी पक्ष हा 40 जागांवर लढला होता पण एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे भाजपला चांगले माहिती आहे की त्यांची लढत थेट काँग्रेससोबत आहे. त्यामुळे भाजप कोणतीही संधी सोडणार नाही.