जोडीदार शोधा आणि मोफत लग्न सुद्धा, शिर्डीच्या साईबाबा विवाह संस्थानकडून वेबसाईट सुरु
श्री साई बाबा विवाह सेवा संस्थानने shirdivivah.com या वेबसाईटचं लोकार्पण केलं. मुला-मुलींसाठी उत्तम आणि मनाप्रमाणे जोडीदार शोधण्याबरोबरच शिर्डीत सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत लग्न लावता येणार आहे
शिर्डी : शिर्डी साईबाबांच्या नगरीत सर्वसामान्यांना आपल्या मुला-मुलीचे विवाह करता येणं आता सहज शक्य होणार आहे. साईबाबा विवाह सेवा संस्थानने शिर्डी विवाह डॉट कॉम ही मॅट्रिमोनियल वेबसाईट सुरु केली असून या वेबसाईटचं उद्घाटन करण्यात आलं. आपल्या मुला-मुलींसाठी उत्तम आणि मनाप्रमाणे जोडीदार शोधण्याबरोबरच शिर्डीत सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत लग्न लावता येणार आहे.
दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीतून मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही वेबसाईट पूर्णत: मोफत असून कोणतेही शुल्क देण्याची गरज नसल्याचे संस्थेचे अध्यक्ष रोशन कुमार यांनी सांगितलं.
देशविदेशात ख्याती असलेल्या शिर्डीच्या साई बाबा चरणी लाखो भक्त लीन होतात. कोणी नोकरीसाठी तर कोणी मुलाबाळांसाठी साईबाबांकडे मागणं मागतं. तर अनेक जण आपल्या मुला-मुलींना उत्तम जोडीदार मिळावा यासाठी साईबाबांकडे प्रार्थना करत असतो. हीच बाब लक्षात घेऊन श्री साई बाबा विवाह सेवा संस्थानच्या वतीने शिर्डी विवाह डॉट कॉम ही मॅट्रिमोनी वेबसाईट सुरु करण्यात आली. या पोर्टलवर कुठल्याही जाती धर्माच्या आणि सर्व वयाच्या वधुवरांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
श्री साई बाबा विवाह सेवा संस्थानचा मुख्य उद्देश आहे की शिर्डी विवाह डॉट कॉम लॉन्च करुन देशभरातून आणि जगभरातील साईभक्त ज्यांच्या मुला-मुलींची लग्न होत नाही, अडचणी येत आहेत, शिर्डीत बाबांच्या चरणी येऊ शकत नाहीत, ते शिर्डी विवाह डॉट कॉमवर रजिस्टर करु शकतात. ही पूर्णत: मोफत वेबसाईट आहे. जे जे पालक आपल्या मुलाचं रजिस्ट्रेशन करतात, त्यांच्या प्रोफाईलची प्रिंट काढून ती साईबाबांच्या चरणी अर्पित केली जाते. यानंतर ती प्रोफाईल अॅक्टिव्हेट केली जाते. यानंतर पालक इतर साई भक्तांशी संपर्क करुन आपल्या पाल्यासाठी स्थळ निवडू शकतात. या वेबसाईटवर तीन प्रकारच्या तीन सेवा दिल्या जातात. एक पूर्णत: मोफत आहे, ज्यांना पैशांची अडचण आहे किंवा गरीब आहेत ते इथे रजिस्टर करु शकता. काहींसाठी पेड आणि पर्सनलाईज सेवा आहे. यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर सामूहिक विवाह आयोजन करण्यात वापर केला जाईल, असं संस्थेचे अध्यक्ष रोशन कुमार यांनी स्पष्ट नमूद केलं.