एक्स्प्लोर
शिर्डी नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर मनसे नगरसेवकाचं अपहरण
नगराध्यक्ष कोण होणार ही चर्चा सुरु असताना, मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचं अपहरण झालं.

शिर्डी : शिर्डी नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकाचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिर्डी नगरपंचायतीचे मनसेचे एकमेव नगरसेवक दत्तात्रय कोते यांचं बंदुकीचा धाक दाखवून काल मध्यरात्री (24 जून) अपहरण झालं. मात्र अपहरणकर्त्यांनी कोते यांना पहाटेच्या सुमारास शनीशिंगणापूरजवळ सोडून दिल्यानंतर ते पोलीस ठाण्यात दाखल झाले. कोते यांच्या तक्रारीनंतर अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिर्डी नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीच्या प्रकियेला कालपासून सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी विखे पाटील गटाच्या तीन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नगराध्यक्ष कोण होणार ही चर्चा सुरु असताना, मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचं अपहरण झालं. दत्तात्रय कोते आपल्या मित्रांसोबत पुण्याला जात असताना, प्रवरानगर फाट्याजवळील हॉटेल ग्रीनपार्क इथे थांबले. त्याचवेळी एका गाडीतून आलेल्या चार जणांनी कोतेंना बंदुकीचा धाक दाखवून आपल्या गाडीत घालून अपहरण केलं. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी लोणी पोलिसांना याबाबत तक्रार देताच शोधाशोध सुरु झाली, मात्र त्यांचा कुठेही तपास लागला नाही. पहाटेच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी नगरसेवक दत्तात्रय कोते यांना शनीशिंगणापूरजवळ सोडून दिल्यानंतर कोते स्वतः लोणी पोलिस ठाण्यात सकाळी हजर झाले. राजकारणात पडू नको नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिल्याचं कोते यांनी सांगितलं. तसंच अपहरणकर्त्यांना कोणाचा तरी फोन आल्याने मला रस्त्यात सोडून ते फरार झाले, असं कोते यांनी सांगितलं. दत्तात्रय कोते यांनी घडलेली सगळी घटना सांगितल्यानंतर लोणी पोलिस स्टेशनमध्ये आज चार अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे. दोन दिवसानंतर शिर्डीमध्ये नगराध्यक्षपदाची निवड होते आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या निवडणुकीतून हा प्रकार घडला की अन्य काही कारणामुळे? हे अपहरण का झालं? की अपहरणाचा बनाव केला याचा तपास आता पोलिस करत आहेत.
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















