हॉटेल, पर्यटन व्यावसायिकांना दिलासा द्या, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
लॉकडाऊनमुळं राज्यातील हॉटेल व्यावसायिक पर्यटन उद्योग तसेच इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या अडचणीत त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना वीज बिलात आणि मालमत्ता करात सवलत द्यावी अशी मागणी करत एक पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
मुंबई : राज्यात कोरोनामुळं लॉकडाऊन करण्यात आला आहे. यात अनेक व्यावसायिकांचं कंबरडं मोडलं आहे. लॉकडाऊनमुळं राज्यातील हॉटेल व्यावसायिक पर्यटन उद्योग तसेच इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या अडचणीत त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना वीज बिलात आणि मालमत्ता करात सवलत द्यावी अशी मागणी करत एक पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
शरद पवारांनी म्हटलं आहे की, कोविड-१९ ह्या जागतिक महामारीच्या दुसर्या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत मला अवगत केले. त्यांनी प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे आज राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले, असं पवार यांनी सांगितलं आहे.
आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने त्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करतील, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या या संकटातून जनतेला दिलासा मिळेल, हा विश्वास मला आहे, असंही पवारांनी म्हटलं आहे.