एक्स्प्लोर
शरद पवार भावी राष्ट्रपती : सुशीलकुमार शिंदे
पुण्यात आज माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा गौरव सोहळा पार पडला.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भावी राष्ट्रपती आहेत, असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं.
पुण्यात आज माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी हे वक्तव्य केलं.
सुशीलकुमार शिंदे पवारांकडे बघत म्हणाले, एका माजी राष्ट्रपतीचा सन्मान भावी राष्ट्रपतीकडून होतोय. मात्र यानंतर लगेचच पवारांनी हात हालवत नाही अशी खुण केली. त्यावरही सुशीलकुमार शिंदेंनी चुटकी घेत, पवार जेव्हा नाही म्हणतात तेव्हा ते होय असं समजायचं असतं हे मला त्यांच्यासोबत इतकी वर्ष राहिल्यानंतर समजलं असं म्हणाले.
सुशीलकुमार शिंदेंच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
शरद पवारांमुळे मला कात्रजचा घाट कसा पार करायचा हे समजलं, तर प्रतिभा पाटलांमुळे गरिब जनतेसाठी कसं काम करावं हे कळलं. राजकारणात या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, असं सुशीलकुमार म्हणाले.
या कार्यक्रमाला काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे सुद्धा उपस्थित होते.
सुशिलकुमार शिंदे त्यांच्याबाबत म्हणाले, शिवराज पाटील चाकूरकर सभ्य आहेत. परंतु मी तसा नाही. मी पोलिस खात्यातील माणूस असल्याने पोलिसाचे काही गुण माझ्यात आहेत. माझा भैरवसिंह शेखावत यांच्याकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. मात्र त्याच भैरवसिंह शेखावतांना प्रतिभाताई पाटलांनी पराभूत केलं.
शरद पवार यांचं भाषण
प्रतिभाताईंचं मुख्यमंत्रिपद मी हिरावलं - पवार
प्रतिभाताईंनी गेल्या पन्नास वर्षात खान्देश, महाराष्ट्र आणि देशाची सेवा करण्याची कामगिरी केली. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. त्यांना मुक्ताईचा आशिर्वाद आहे. प्रतिभाताईंनी अनेक पदं भूषवली. राहता राहीलं एक पद ते म्हणजे मुख्यमंत्रीपद. ते पद मीच हिराऊन घेतलं हे ही इथे सांगतो, असं शरद पवार म्हणाले.
मी गोव्यात असताना राजीव गांधींचा मला फोन आला, पहाटे चार वाजता आणि त्यांनी मला दिल्लीला भेटायला बोलावलं. मी दिल्लीत पोहचलो आणि राजीव गांधींनी मला मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला सांगितली. खरं तर त्यावेळी ती संधी प्रतिभाताईंची होती. परंतु काही गोष्टी विधीलिखीत असतात, असं शरद पवारांनी नमूद केलं.
यूपीएच्या काळात शेतीबद्दलचे धोरणात्मक निर्णय राष्ट्रपती भवनातून झाले. प्रतिभाताईंनी शेती धोरणासंबंधी बैठका घेऊन महत्वाची भूमिका पार पाडली.
मगाशी बोलता बोलता या पदासाठी (राष्ट्रपतीपदासाठी) माझ्या नावाचा उल्लेख झाला. परंतु मी नाही म्हणालो, कारण राज्यपाल किंवा राष्ट्रपती बनलेला माणूस राजकारणातून निवृत्त होतो. सुशीलकुमार शिंदे याला अपवाद होते. राज्यपालपद भूषवल्यावर ते पुन्हा केंद्रीय गृहमंत्री झाले. मला त्यांच्याएवढी उडी जमणार नाही. अखेरपर्यंत लोकांमधे जाता यावं, त्यांच्याशी संवाद साधता यावा, यासाठी हे पद नको अशी माझी त्यामागची भूमिका आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
प्रतिभाताई पाटील यांचं भाषण
माझ्या वडिलांमुळे आणि यशवंतराव चव्हाणांमुळे मी राजकारणात आले. शरद पवारांनी माझी मुख्यमंत्रीपदाची संधी हुकवली आणि अटकही करवली. आम्ही त्यावेळी इंदिरा काँग्रेसमध्ये होतो. माझा वाढदिवस असल्याने मी जळगावला होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला अटक करण्याची तयारी चालवली. आम्ही मोर्चा काढला आणि पोलिसांनी आम्हाला अटक केली. त्यावेळी मी वडिलांच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू पाहिले.
शरद पवार मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्षनेता होते. सडकून टीका करायचे. परंतु आमच्यामध्ये कधीही कटुता आली नाही. आपलेपणा कमी झाला नाही. या कार्यक्रमासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
शरद पवारांना पंतप्रधान बनण्याची संधी आली होती तेव्हा आम्ही सर्वांनी त्यांच्या नावाला पाठींबा दिला. बाळासाहेब ठाकरेंचे ऋण कायम राहतील. त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी बिनशर्त पाठींबा दिला, असं प्रतिभाताई पाटील म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement