![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Video : ठाकरे-शंकराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका; विश्वासघातकी असाही उल्लेख
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली होती
![Video : ठाकरे-शंकराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका; विश्वासघातकी असाही उल्लेख Shankaracharya visit on uddhav Thackeray house, Mahant questions about Shankaracharya visit? Strong criticism on Uddhav Thackeray too; Also mentioned as treacherous Video : ठाकरे-शंकराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका; विश्वासघातकी असाही उल्लेख](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/16/2becd61d78927a1bb8780c607218ecf517211207950831002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : परमपूज्य शंकराचार्य यांच्यासह काशी-वाराणसीतून अनेक संत, महंत आणि धर्मगुरु मुंबईतील अंबानी कुटुंबीयांच्या लग्नसोहळ्यात आशीर्वाद देण्यासाठी आले होते. त्यामध्ये, ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Jyotirmatha shankaracharya Avimukteshwaranand) यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथील उपस्थित शंकराचार्यांचे आशीर्वादही घेतले होते. या लग्नसोहळ्यात उद्धव ठाकरेही सहकुटुंब उपस्थित होते. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या निमंत्रणावरुन शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांचा पाहुणचार स्वीकारला. या भेटीवेळी बोलताना, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे, जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री (Chief Minister) होत नाहीत तोपर्यंत दु:ख जाणार नाही, अशा शब्दात शंकराचार्यांनी खंत व्यक्त केली. शंकराचार्यांच्या या भेटीमुळे व विधानामुळे भाजपची गोची झाली. मात्र, आता हिंदूंच्या महंतांनी पुढे येऊन ठाकरेंवर जोरदारी टीका केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पद भूषवलं. त्यामुळे, भाजपकडून सातत्याने शिवसेनेनं हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप केला जात आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडूनही ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदूत्व सोडल्याचा आरोप केला जातो. त्यातच, ज्योतीर्मठाच्या शंकराचार्यांना घरी बोलावून उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आरोपालाच एकप्रकारे उत्तर दिलंय. त्यावरुन, आता आचार्य प्रमोद कृष्णम आणि महंत नारायण गिरी यांनी परमपूज्य शंकराचार्यांनी विचारपूर्वक आणि समजून घेऊन बोलायला हवे असे म्हटले आहे.
पूज्यपाद्य शंकराचार्य यांनी आवर्जून सांगायला पाहिजे की, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेसोबत विश्वासघात केला आहे, त्यावर काय म्हणायचं आहे. ज्यांनी सनातन धर्माच्या विचारधारेबद्दल विश्वासघात केला, ज्यांनी वीर सावरकर यांच्या विचारधारेसोबत विश्वासघात केला, त्यावर काय म्हणायचं, असा सवाल आचार्य प्रमोद कृष्णम यांनी विचारला. तसेच, शंकराचार्यांनी यावर प्रकाश टाकायला हवा, मला पूर्ण विश्वास आहे की, पूज्यपाद्य शंकराचार्यजी यावर नक्कीच प्रकाश टाकतील,असेही महंतांनी म्हटले.
महंत नारायण गिरी महाराज म्हणाले
आम्ही कोणाला विश्वासघाती म्हणतोय, कोणाला धोकेबाज म्हणतोय हे विचारपूर्वक आणि समजून घेत पूज्यनीय शंकराचार्यांनी विधान करायला हवं. उद्धव ठाकरे हे विद्रोही लोकांसोबत गेले होते. त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आशीर्वाद देणे हा समस्त हिंदू समाजाच छळ असल्याचं महंत नारायण गिरी यांनी म्हटलं आहे. परमपूज्य आणि परम वंदनीय शंकराचार्य यांनी असं विधान करणं योग्य नाही, असेही महंतांनी म्हटलं.
काय म्हणाले होते शंकराचार्य
आपण सगळे हिंदू आणि सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. पुण्य पापाची भावना आपल्याकडे सांगितली आहे . सगळ्यात मोठा घात हा विश्वासघात असतो. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झालेला आहे , याबाबतची पीडा अनेकांना आहे. त्यांच्या निमंत्रणानंतर मी मातोश्रीवर आलो त्यांनी माझं स्वागत केलं. मी त्यांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर खुर्चीवर परत बसत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही. कोणाचं हिंदूत्व खरं हे समजून घ्यावे लागेल. पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो. जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असतो. जनतेचा सुद्धा अपमान करण्यात आलेला आहे, जनमताचा अनादर करणे हे चुकीचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)