"सर मला खूप आवडतात, मी सरांसोबत लग्नासाठी पळून जात आहे", चिठ्ठी लिहून सातवीतील मुलीचे शिक्षकाबरोबर पलायन
मुलीने लिहिलेली चिठ्ठी घरात सापडल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला. तातडीने सर्वांनी तिचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती कुठेच सापडली नाही.
नाशिक : "मला सर खूप आवडतात मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे, अशी चिठ्ठी अल्पवयीन मुलगी आपल्या खोलीत ठेवून घरातून शिक्षकाबरोबर पळून गेल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या निफाड तालूक्यातील देवपूर येथे घडली आहे.
निफाडच्या देवपूर येथील मोठ्या कुटुंबातील ही मुलगी कुंदेवाडी येथे सातवीच्या वर्गात शिकत होती. इयता दुसरी पासून ती खाजगी शिकवणीसाठी शिक्षक पंकज श्याम साळवे या 23 वर्षीय सरांकडे जात होती. दोन दिवसापूर्वी सदरची अल्पवयीन असलेल्या या मुलीने आपल्या हस्त अक्षरात "सर मला खूप आवडतात. मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे",अशी चिठ्ठी लिहून ती घरातून निघून गेली.
मुलीने लिहिलेली चिठ्ठी घरात सापडल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला. तातडीने सर्वांनी तिचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती कुठेच सापडली नाही. त्याच वेळी शिक्षक पंकज साळवे यांच्या घरी कुटुंबीय खात्री करण्यासाठी गेले असता त्यांच्या घराला कुलूप आढळल्याने, मुलीच्या कुटुंबाने तातडीने निफाड पोलिस स्टेशन गाठले.
मुलीच्या आईने शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असून शिक्षक साळवे हा एका शाळेत हंगामी शिक्षक म्हणून काम करतोय. तर देवपूर परिसरात दोन-तीन ठिकाणी क्लासेस घेण्याचे काम करतो. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पंकज साळवे याच्या गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती निफाडचे पोलिस उपअधिक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली आहे.
सदरच्या शिक्षकाने मुलीबरोबर प्रेम संबंध निर्माण करुन तो त्यामुलीला घेऊन गेला. मुलगी अल्पवयीन असल्याने त्या चिठ्ठीला फारसे महत्व नसल्याचं पोलिस अधिक्षकांच म्हणणे असून सदरच्या शिक्षकाचा निफाड पोलिस सध्या शोध घेत आहे.