श्रीरामपूरमध्ये घराच्या खोदकामात सापडले 'गुप्तधन', चर्चा वाढल्यानंतर गुप्तधन प्रशासनाच्या ताब्यात
श्रीरामपूर तालुक्यात खोदकाम करणाऱ्या कामगारांना चांदीच्या नाण्यांचा एक हंडा सापडला आहे. या हंड्यात चांदीची 11 किलो 6 ग्रॅम वजनाची 1020 नाणी सापडली आहेत.
अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे व्यापारी राजेश खटोड यांच्या घराचे खोदकाम करताना एक हंडा सापडला. या हंड्यात चांदीची 11 किलो 6 ग्रॅम वजनाची 1020 नाणी सापडली आहेत. ही सापडलेली नाणी सुमारे 8 लाख रुपये किमतीचे असून हे गुप्तधन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करुन ते ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. सोने व चांदीने भरलेला भला मोठा हंडा मिळून आल्याची अफवा गावात झाल्यानंतर बेलापूर येथील राजेश खटोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज केला. त्यात त्यांनी म्हटले की, माझ्या जुन्या घराच्या आवारात खोदकाम करताना गुप्तधन सापडले असून सरकारी नियमानुसार पंचनामा करुन ते ताब्यात घेण्याची विनंती केली होती. त्या नंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी संबंधित ठिकाणी जाऊन ते गुप्तधन ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी गावात बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून गुप्तधनाचा पंचनामा केला आहे. त्या पंचनामात त्यांना 11 किलो 6 ग्राम चांदी मिळून आली त्यात चार आणे किंमतीची 46 नाणी होती आठ आणे किमतीची 58 नाणी तर दोन अरबी नाणी व एक रुपये किमतीची 914 नाणी अशी एकुण 1020 नाणी आढळून आली असून सदर गुप्त धन तहसीलदार पाटील यांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान 10 दिवसांपूर्वी सापडलेल्या हांड्यात सोनं ही असल्याची चर्चा सुरू होती. मात्र प्रशासनाने पंचनामा केला असता त्यात केवळ चांदी आढळून आली. खोदकाम करणाऱ्या कामगारांनी त्यावेळीच हंडा जागा मालकाच्या ताब्यात दिला आणि त्यानंतर 10 दिवसांनी तो प्रशासनाने ताब्यात घेतला असून यातील सोन गायब झालं की नव्हतचं अशा चर्चा मात्र जोरदार सुरू आहेत.