Satara Loksabha : शिरूर लोकसभेला शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश देऊन उमेदवारी निश्चित करण्यात आल्यानंतर आता तोच खेळ सातारा लोकसभेला होणार का? याची चर्चा आहे. सातारा लोकसभेसाठी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शड्डू ठोकला असून त्यांनी बुधवारपासून दिल्लीमध्ये तळ ठोकला आहे. त्यांच्या उमेदवारीवरून राज्यामध्येही महाविकास आघाडीने भाजपवर बोचरी टीका सुरु केली आहे.
दयनराजे भोसले घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता
या सर्व पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी निश्चित असली, तरी मात्र पक्ष निश्चित झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.
मनसेचा निर्णय राज्य पातळीवर होणार
दरम्यान, जागा वाटपावर महायुतीमध्ये अजूनही खल सुरुच असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी काल चर्चा झाल्यानंतर आज पुन्हा एकदा महायुतीमधील घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये मनसेच्या सहभागा संदर्भात राज्य पातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान काल झालेल्या बैठकीमध्ये रामटेकची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटल्याची माहिती आहे. राजू पारवे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या जागावाटपावर अजूनही तिढा कायम असून शिंदेकडील जागांवर कोणाचे उमेदवार असणार? त्यांना किती जागा मिळणार? तसेच अजित पवार गटाला किती जागा मिळणार आणि मिळाल्यास त्या कोणत्या असणार याची चर्चा अजूनही सुरुच आहे. राज ठाकरे यांच्यासाठी सुद्धा महायुतीने डोळा मारल्याने त्यांचा सहभाग झाल्यास कोणत्या जागा सोडणार हा सुद्धा तिढा असणार आहे.
महायुतीच्या नेत्यांकडून गेल्या 10 दिवसांपासून 80 टक्के बोलणी झाली असल्याचे सांगत असले, तरी परिस्थिती तशी नसल्याचे चित्र आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले जागेवरही शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. याठिकाणी भाजपने दावा केला आहे. माढावरूनही संघर्ष सुरु आहे. सोलापुरात सुद्धा भाजपमध्ये उमेदवारीचा पेच कायम आहे. मुंबईमधील तीन जगाांवरूनही भाजपमध्ये तिढा कायम आहे. त्यामुळे हा पेच कसा सोडवला जाणार आहे याची चर्चा रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या