नागपूर : महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) नागपूर (Nagpur) जागेसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. ही जागा काँग्रेसच्या (Congress) वाट्याला आली असून येथून विकास ठाकरे (Vikas Thakre) हे निवडणूक लढवणार आहेत. आता येथे भाजपचे नेते नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नेते विकास ठाकरे अशी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान,उमेदवारी जाहीर होताच विकास ठाकरे कामाला लागले असून त्यांनी नितीन गडकरींवर तोफ डागली आहे. विकास ठाकरे हे काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आहेत. 


गडकरी मोदींच्या लाटेवर निवडून आले


लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी 'एबीपी माझा'शी खास बातचित केली. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांच्यावर सडकून टीका केली. नितीन गडकरी हे नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर निवडून आलेले खासदार आहेत. नितीन गडकरी म्हणतात की त्यांनी नागपूर शहराचा विकास केला. मग त्यांच्या आधी हा विकास कधी झाला नव्हता का ? असा सवाल ठाकरे यांनी केला.  


13 वेळा काँग्रेसचे खासदार कसे निवडून आले.


नागपूरमध्ये आतापर्यंत 13 वेळा काँग्रेसचे खासदार कसे निवडून आले. विमानतळ, एमआयडीसी, मिहान ही कोणाची देण आहे, असे अनेक प्रश्न विकास ठाकरे यांनी उपस्थित केले. तसेच  केलेल्या विकासाचा सामान्य नागरिकांना किती फायदा झाला, याचे उत्तरही नितीन गडकरी यांनी द्यावे, असे आव्हान ठाकरे यांनी केले.


नागपूरमध्ये कोण बाजी मारणार? 


नितीन गडकरी हे नागपूर तसेच राज्यातील मोठं नाव आहे. ते केंद्रात मंत्री असून आपल्या कार्यकाळात त्यांनी नागपूरमध्ये अनेक विकासकामे केल्याचा दावा भाजपकडून केला जातो. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेदेखील नागपूरमधूनच येतात. त्यामुळे नागपूर ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. तर दुसरीकडे ही जागा जिंकून भाजपला चितपट करण्यासाठी काँग्रेसने तयारी चालू केली आहे. नागपूर काँग्रेसमधील नेते गटतट विसरून कामाला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत विकास ठाकरे यांना निवडून आणायचं असा विश्वास येथील नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नागपूरच्या जागेवर नेमका कोणाचा विजय होणार आहे? काँग्रेस ही जागा खेचून आणणार का? हे पाहावे लागणार आहे.


हे ही वाचा >>


Devendra Fadnavis : तर उदयनराजेंना महाविकास आघाडी बिनविरोध करणार का? शाहू महाराजांबद्दल विचारताच देवेंद्र फडणवीसांचा सवाल!


Kedar Dighe : कल्याणमधून केदार दिघे दंड थोपटणार, उद्धव ठाकरेंच्या डावावर श्रीकांत शिंदेंचं थेट उत्तर; कोण बाजी मारणार?