Madha Loksabha : दिलेली उमेदवारी किंवा घेतलेला निर्णय काही झालं तरी मागे घेत नसलेल्या भाजपला पहिल्यांदाच ते सुद्धा पीएम मोदी यांच्या बालेकिल्ला असलेल्या थेट गुजरातमध्ये बॅकफूटवर जावं लागलं आहे. लोकसभेसाठी भाजपने तिसऱ्यांदा रिंगणात उतरलेले वडोदराचे विद्यमान खासदार रंजन भट्ट (Vadodara MP Ranjan Bhatt) आणि साबरकांठाचे उमेदवार भिखाजी ठाकोर (Sabarkantha candidate Bhikhaji Thakor) पहिल्यांदाच रिंगणात उतरले होते. मात्र त्यांनी आपली नावे जाहीर झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी वैयक्तिक कारणास्तव शनिवारी निवडणुकीतून माघार घेतल्याचे पक्षाने जाहीर केले. थेट गुजरातमध्ये हा प्रकार घडल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
उमेदवारी जाहीर होताच कडाडून विरोध
रंजन भट्ट यांच्या उमेदवारीमुळे वडोदरा भाजपमध्ये रणकंदन सुरु झाले होते. उमेदवारी माघारीचा निर्णय स्वाभिमान आणि खोटे आरोप संपवायचे असल्याने घेतला असल्याचे म्हटले आहे. रंजन भट्ट आणि भिकाजी ठाकोर या दोघांनी सोशल मीडियावर शर्यतीतून माघार घेतल्याची घोषणा केली. रंजन भट्ट यांनी सोशल मीडियावर निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे भाजपला निरोप दिल्याचे म्हटले आहे. ठाकोर यांनी फेसबुक पेजवर पोस्ट केले की ते लढवण्यास इच्छुक नाहीत. परंतु त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याची पुष्टी दिल्यानंतर लगेचच त्यांनी पोस्ट मागे घेतली, ज्यामुळे आणखी अटकळ सुरू झाली. याठिकाणी सुद्धा अंतर्गत वाद टोकाला गेल्याने ठाकोर यांना काढता पाय घ्यावा लागला आहे.
रंजन भट्ट यांच्यावर गंभीर आरोप
भाजपच्या महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ ज्योती पंड्या यांना रंजन भट्ट यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. खासदार 10 वर्षांच्या कार्यकाळात अकार्यक्षम असल्याचा आरोप करत शहरासाठी असलेल्या "विकास निधी" वरून गंभीर आरोप केले होते.
उमेदवारीविरोधात बॅनरबाजी
यानंतर भट्ट यांच्या उमेदवारीच्या विरोधात बॅनर दिसू लागले. माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून गेल्या 10 दिवसांत ज्याप्रकारे सर्व घडामोडी घडत आहेत, त्यावरून मला असे वाटले की पक्षाने मला तिकीट दिले असले तरी मी निवडणूक लढवू नये, मी भाजपचा सदस्य म्हणून काम करत राहीन आणि जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे भट्ट यांनी सांगितले.
ठाकोर यांनी फेसबुकवर वैयक्तिक कारणांमुळे निवडणूक लढवण्यास तयार नाही, असे सांगितले. माजी विश्व हिंदू परिषद (VHP) कार्यकर्ता आणि 34 वर्षांपासून भाजपसोबत असलेले OBC नेते, ठाकोर हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रथमच उमेदवार आहेत आणि त्यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदे भूषवली आहेत. ते मूळचे साबरकांठा येथील भिलोडा येथील आहेत.
गुजरातमध्ये भाजपकडून 26 पैकी 22 उमेदवार जाहीर
या घडामोडींनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, पक्षाला दोन्ही जागांवर लवकरच बदली उमेदवार मिळतील. भाजपच्या दोन्ही नेत्यांनी वैयक्तिक कारणांसाठी हा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत दोन्ही जागांवर इतर संभाव्य उमेदवार शोधून काढू. आम्ही नावे निवडू आणि संसदीय समितीची मंजुरी मिळाल्यानंतर त्यांची नावे जाहीर केली जातील, असे ते म्हणाले. भाजपने आतापर्यंत लोकसभेच्या 26 पैकी 22 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, भट्ट आणि ठाकोर यांनी माघार घेतल्याने सहा जागांसाठी उमेदवार जाहीर करावे लागणार आहेत. भट्ट यांनी पहिल्यांदा ऑक्टोबर 2014 मध्ये वडोदरा येथून पोटनिवडणूक जिंकली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारसंघ सोडला होता.
गुजरातचे प्रतिबिंब माढामध्ये उमटणार?
दरम्यान, गुजरातमधील ज्या दोन जागांवर भाजपला उमेदवार देऊन सुद्धा माघार घेण्याची वेळ आली, तोच प्रकारआता महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये होणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. माढामध्ये भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर अक्षरशः रणकंदन सुरू आहे. याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रामराजे निंबाळकर गटाकडून रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला थेट विरोध करण्यात आला आहे, तर भाजपमध्येच असलेल्या मोहिते पाटील गटाकडून सुद्धा रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करण्यात आला आहे.
इतकेच नव्हे तर रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीमुळे जोरदार राडा सुद्धा झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माढामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी बदलणार का? अशी चर्चा रंगली आहे. याठिकाणी महायुतीकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न आटोकाट केला जात असला, तरी त्यामध्ये अजून यश आलेलं नाही. त्यामुळे गुजरातमधील घडामोडींचा परिणाम माढावर तर होणार नाही ना? असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या