Sanjay Raut: संजय राऊतांनी शेअर केला 'मराठा क्रांती मोर्चा'चा व्हिडीओ? भाजपकडून हल्लाबोल, संघटनाही आक्रमक
Sanjay Raut Tweet: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे.
Sanjay Raut Tweet: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. कालच्या महामोर्चावरुन रंगलेल्या राजकारणानंतर फडणवीसांनी हा मोर्चा नॅनो मोर्चा असल्याचं म्हटलं. याला उत्तर देताना राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा दावा भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे.
राऊतांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी. हे वागणे बरे नाही.जय महाराष्ट्र! असं राऊतांनी व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे. या व्हिडीओवरुन टीका होऊ लागल्यानंतर राऊतांनी पुन्हा एक ट्वीट करत म्हटलं आहे की, मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान, न्याय्य हक्कांसाठी निघाला.शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्याप्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करत होते.दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच! असं राऊतांनी दुसरं ट्वीट करत म्हटलं.
देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच!
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 18, 2022
महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज.
देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/DReN1k20LS
मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान.. न्याय्य हक्कांसाठी निघाला.शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्या प्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करीत होते.दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच!
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 18, 2022
फडणवीसांनी याबाबत काय म्हटलं...
संजय राऊतांनी एक व्हिडीओ ट्वीट केला. मी त्या मोर्चाला नॅनो मोर्चा म्हटलं होतं. आज जो त्यांनी व्हिडीओ ट्वीट केला तो मराठा मोर्चाचा व्हिडीओ आहे, अशी मला माहिती मिळाली आहे. मला याबाबत काही कल्पना नाही पण असं होऊ शकतं. कारण मोठा मोर्चा नव्हता, त्यामुळं व्हिडीओ आणायचा असेल तर तो दुसऱ्या मोर्चाचाच आणावा लागेल, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
यावर उत्तर देताना भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, सर्वज्ञानींना आता काय म्हणावं? अजून किती उघडे पडाल? परवा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अज्ञानानं तोंडघशी पडले ते काही कमी झालं नाही तर आता चक्क नॅनो मोर्चाचं अपयश झाकायला थेट मराठा मोर्चाचा आधार घेतला?अहो सर्वज्ञानी संजय राऊतजी मविआ मोर्चा म्हणून तुम्ही पोस्ट केलेला व्हिडीओ तरी निदान पहा.. हा 2017 चा मराठा समाजाचा खरा विराट मोर्चा. देवेंद्रजींची टीका खरी होती म्हणून काय थेट अशी सारवासारव? हा तर मराठा समाजाचाही अपमानच, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
मराठा क्रांती मोर्चाची प्रतिक्रिया काय...
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अंकुश कदम यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत जनाची नाहीतर मनाची लाज बाळगा. संजय राऊत तुम्ही मराठा क्रांती मोर्चाचे जुने व्हिडीओ टाकून शिल्लक सेनेची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करत असाल आणि राजकीय फायद्याचा विचार करत असाल तर हा तुमचा ढोंगीपणा आहे. ज्या मोर्चाची मुका मोर्चा म्हणून तुम्ही टिंगल उडवली त्याच मोर्चाचा आधार तुम्हाला घ्यावा लागत असेल तर तुम्ही प्रायश्चित्त करायला हवे. निषेध निषेध निषेध संजय राऊतचा जाहीर निषेध, असं कदम यांनी म्हटलं आहे.