सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ सुरु : संजय राऊत
Sanjay Raut Press Conference : सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ सुरु आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

Sanjay Raut Press Conference : सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ सुरु आहे, असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर केला आहे. हिवाळी अधिवेशनाची पुढची रणनिती ठरवण्यासाठी थोड्याच वेळात बैठक सुरु होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "हा देश अखंड राहावा, एक राहावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. हा फक्त बाबरी पाडल्याचा दिवस नाही, तर राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करण्याचा दिवस आहे."
महापुरुषांबद्दल लिखाण करताना आपण भान बाळगलं पाहिजे : संजय राऊत
नाशिकमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करण्यात आली. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "काल माझ्यासह अनेकांनी याप्रकरणी भावना व्यक्त केल्या. शरद पवारांनीही याबाबत भावना व्यक्त केल्या. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या प्रांगणात अशा प्रकारचं कृत्य होणं, याचा आम्ही निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले असे जे अनेक युगपुरुष आहेत, जे महाराष्ट्रानं देशाला दिले आहेत. त्याच्याविषयी लिखाण करताना, अत्यंत सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. कारण लाखो-कोट्यवधी लोकांच्या भावना या प्रमुख युगपुरुषांशी जोडलेल्या आहेत. खासकरुन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल."
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही लिखाण आणि वक्तव्य केल्याबद्दल पंडित नेहरुंनाही माफी मागावी लागली होती. मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती." , असंही ते म्हणाले. "छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचं वेडंवाकडं, महाराष्ट्रात खपवून घेतलं जात नाही." असं इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ होतोय : संजय राऊत
"नागालँडमध्ये झालेल्या घटनेवरुन सरकारनं माफी मागितली. पण कधी दहशतवाजी समजून गोळ्या घातल्या जातात. तर अनेकांना देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबलं जातं. फक्त गोळ्या घातल्या जात नाही एवढंच. सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ केला जातो. फक्त त्यांच्या हातात बंदुका नाहीत. वेगळ्या प्रकारे छळ केला जातो. राज्य करण्याची ही प्रवृत्ती आणि विकृती वाढत जात आहे.", असं संजय राऊत म्हणाले.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या लाईव्हमध्ये, पाहण्यासाठी क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
