'विरोधकांच्या चारित्र्यहननाठी सायबर फौजांचा वापर देशावरच उलटेल', संजय राऊतांची रोखठोक टीका
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना 'राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन आणि विरोध करणाऱ्यांना खच्ची करण्यासाठी या फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो' असा इशारा देत सल्ला दिला आहे.

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना 'राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन आणि विरोध करणाऱ्यांना खच्ची करण्यासाठी या फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो' असा इशारा देत सल्ला दिला आहे. सामनातील आपल्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी फेक अकाऊंटसबद्दल भाष्य केलं आहे.
राऊत यांनी म्हटलं आहे की, अमित शाह आज देशाचे गृहमंत्री आहेत. सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो हे त्यांनी मान्य केले पाहिजे. राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन आणि विरोध करणाऱ्यांना खच्ची करण्यासाठी या फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो. अमित शाह यांनीच एका कार्यक्रमात सांगितले होते, 'आम्ही कोणतीही बातमी आमच्या हजारो ‘व्हॉटस्ऍप’ ग्रुपच्या माध्यमांतून पटवून देऊ शकतो' हा आत्मविश्वास एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून ठीक आहे, पण आज देशाची सूत्रे आपल्या हाती आहेत हे त्यांना विसरता येणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबई पोलीस आणि सरकारच्या बदनामीसाठी 80 हजार फेक अकाऊंट्स उघडली, सायबर सेलचा अहवाल
त्यांनी म्हटलं आहे की, ज्या सोशल मीडियाने मनमोहन सिंग व राहुल गांधी यांना निकम्मे ठरवले, त्याच सोशल मीडियावर रिकाम्या बोगद्यात लष्करी गाडीवर उभे राहून आपले पंतप्रधान हात हलवत पुढे निघाले असल्याचा ‘व्हिडीओ’ व्हायरल झाला व पंतप्रधानांची प्रचंड खिल्ली उडवली गेली. हे बरोबर नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, सेनाप्रमुख, पोलीस यांना ‘टार्गेट’ करणे म्हणजे देशाच्या भवितव्याचा खड्डा खणण्यासारखे आहे. सुशांतप्रकरणी एकट्या मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंटस् निर्माण केली जातात. म्हणजे अशा प्रकारची किमान पाच कोटी फेक अकाऊंटस् सोशल मीडियावर सक्रिय आहेत. हे बेकायदेशीर काम कायद्यानेच थांबवायला हवे. देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यात पुढाकार घ्यावा. सुरुवात स्वतःच्या पक्षापासून करावी लागेल,” असा सल्ला राऊत यांनी शाह यांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
