पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरुन सांगलीत तणाव वाढला; पोलिस प्रशासन हाय अलर्टवर
Sangli News Updates : अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीमुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
Sangli News Updates : सांगलीच्या विजयनगर भागातील प्रभाग क्र. 8 मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या 100 मीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 2 एप्रिलपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीमुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते 2 एप्रिल रोजी स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. परंतु त्याआधीच म्हणजे आज, 27 मार्च रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला होता. त्यामुळे कोणताही गोंधळ किंवा कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने हाय अलर्टवर आहे. 2 एप्रिलपर्यंत स्मारक परिसरात संचारबंदी बरोबरच कडेकोट बंदोबस्तासाठी स्मारक परिसरात राज्य राखीव दलाच्या जवानांच्या दोन तुकड्या तैनात केल्या गेल्यात. यामुळे स्मारक परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. शिवाय स्मारकाच्या चारही बाजूनी पत्रे उभे करून स्मारक परिसर बंदिस्त केला गेलाय. स्मारकाच्या चारही बाजू लोखंडी पत्र्याने झाकल्या गेल्या आहेत.
अहिल्यादेवीच्या स्मारकाचा लोकार्पण कार्यक्रम हा काय राष्ट्रवादीचा प्रचाराचे किंवा मेळाव्याचे ठिकाण आहे काय? असा सवाल गोपीचंद पडळकरांनी केला आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने जाऊन स्मारकाचे लोकार्पण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. पोलिसांनी आणि प्रशासनाने आम्हाला अडवू नये, जर संघर्ष होऊन अनुचित प्रकार काही घडला तर त्याला तेच जबाबदार असतील, असंही ते म्हणाले. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरून राष्ट्रवादी वारंवार राजकारण करत आहे, असंही ते म्हणाले.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने विजयनगर इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभारलं आहे. अडीच कोटी रुपये खर्च करुन हे स्मारक बांधण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्मारकाचं लोकार्पण रखडलं होतं. अखेर यंदा महापालिकेने शरद पवार यांच्या हस्ते 2 एप्रिल रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचं निश्चित केलं आहे. मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज 27 मार्च रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचा इशारा दिला होता.