सांगली निकाल : भाजपची मुसंडी, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी चारीमुंड्या चित
सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चारीमुंड्या चित करत भाजप सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चारीमुंड्या चित करत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. जयंत पाटील, विश्वजीत कदम, सतेज पाटलांसारख्या दिग्गज नेत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सांगली महापालिकेत एकूण 78 जागा आहेत. हाती आलेल्या निकालानुसार भाजपनं 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला 35 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसने इथे यंदा राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. मात्र तरीही भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर मात करत, सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपविरोधी सर्व चर्चांचा यामुळे खिळ बसण्याची शक्यता आहे.
मतमोजणीला सुरुवातीला आलेल्या कलानुसार काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठी आघाडी मिळाली होती. मात्र अखेरच्या टप्प्यात भाजपनं जोरदार आघाडी घेतली आहे. सांगली महापालिकेत एकूण 78 जागा आहेत. महापालिका स्थापनेपासून इथं काँग्रेसची सत्ता होती. भाजपनं मिळवलेल्या विजय काँग्रेससाठी मोठी नामुष्की मानली जात आहे.
सांगली-जळगाव महापालिका निकालाचा अर्थ मोर्चे आंदोलनं होऊनही मराठा व अन्य समाजांनी भाजपला साथ दिली हे या निकालातून स्पष्ट झालं. तसेच निवडणुकी आधी दूध दरवाढीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपबद्दल चांगला संदेश गेला. जनतेने या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं मात्र शिवसेनेलाही येथे पर्याय बनता आलं नाही. शहारांचे जुनेच प्रश्न आणि लोकांच्या वाढत्या अपेक्षा समजण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचं या निकालातून स्पष्ट होत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चुकांचा भाजपला फायदा शहरातल्या सगळ्यात मोठ्या समस्या होत्या, रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या, ज्या 15 वर्षाच्या सत्तेतही आघाडीनं सोडवल्या नाहीत. ड्रेनेज योजना पूर्ण करण्याच्या नावाखाली पालिकेनं अख्खी सांगली खोदून ठेवली, लोकांची गैरसोय झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. अँटी इन्कमबन्सी असूनही काँग्रेसनं त्याच त्या चेहऱ्यांना तिकीटं दिली, ज्यामुळे किशोर जाधव, इद्रिस नायकवडींसारखे माजी महापौर या निवडणुकीत पराभूत झाले. खड्ड्यांमधून रस्ता शोधणाऱ्या सांगलीकरांना मुख्यमंत्र्यांनी 33 कोटीचे रस्ते दिले, मिरजेला 20 कोटीचे रस्ते बांधले याचाही भाजपला फायदा होताना दिसत आहे.
सांगली महापालिका पक्षनिहाय आकडेवारी
भाजप- 41 काँग्रेस- 15 राष्ट्रवादी- 20 इतर -2 एकूण- 78