(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : नवा खिलारी बैल बुजल्याने कृष्णा नदीत गेला अन् थेट मगरींच्या तावडीत सापडला! मगरींचा आणि बैलाचा थरारक पाठलाग
बैल पाण्यात उतरल्याचं कृष्णा नदीतील मगरींच्याही निदर्शनास आले होते. मगरीही या बैलाच्या आजूबाजूने घात लावून बसल्या होत्या. त्यांचा बैलाच्या दिशेने या मगरींचा पाठलाग सुरू झाला.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील भिलवडीमधील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये चक्क मगर आणि बैलाचा थरारक पाठलाग पाहायला मिळाला. नदीपात्रात शिरलेल्या बैलावर झडप टाकण्यासाठी मगरींचा झुंड मागावर होता. मात्र, या मगरींना नदीमध्येच बैलाने चकवा देत चार तास हा पाठ शिवणीचा खेळ सुरू ठेवला होता. अखेर बैलाच्या मालकाने आणि जिगरबाज नावाडी चालकांनी मगरीच्या तावडीत सापडण्याआधीच बैलाची कृष्णा नदीच्या पाण्यातून बाहेर काढून सुटका केल्याचा घटना घडली.
नेमका प्रसंग काय घडला?
पलूस तालुक्यातील भिलवडीमधील साठे नगरमध्ये राहणाऱ्या अक्षय मोरे हा बैलप्रेमी आहे. आटपाडीमधील जनावराच्या बाजारामधून गुरुवारी अक्षयने खिलार जातीचा एक जातीवंत बैल तब्बल 70 हजार रुपये देऊन खरेदी केला आणि तो बैल घेऊन एका टेम्पोमध्ये घालून गावी आणण्यासाठी निघाला. टेम्पोतून हा बैल अगदी निवांतपणे गावात पोहोचला. मात्र या बैलाला टेम्पोमधून उतरवत असताना अचानकपणे टेम्पोचा आणि इतर गाड्यांचा हॉर्न वाजला. त्यामुळे नवीन ठिकाण आणि गाड्यांचा आलेला आवाज यामुळे बैल अस्वस्थ होऊन सैराभैरा होऊ लागला. या बैलाला आवरण्याआधीच बैलाने गाडीतून थेट उडी मारून धूम ठोकली आणि तो थेट कृष्णा नदीच्या तीरावर जाऊन पोहोचला.
बैलाला पकडण्यासाठी पळापळ
बैल नदीच्या दिशेने जाताच मागे अक्षय आणि त्याचे इतर मित्र देखील पोहोचले. त्यांनी बैलाला नदीमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. बैलाला पकडण्यासाठी दोरीचा फासही टाकण्यात आला. मात्र त्यामध्ये तो न अडकता थेट पाण्यामध्ये पडला. कृष्णच्या पाण्यात पडताच त्या बैलाला पाण्याचा मोह आवरता आला नाही. मग बैलाने पाण्यातच राहणं पसंत केलं. अक्षय आणि त्याचे मित्र जसे जसे पुढे जाऊ लागले तसा तसा हा बैल पाण्यातून पुढे पुढे सरकू लागला.
बैल दिसताच मगरींची चाहूल
बैल पाण्यात उतरल्याचं कृष्णा नदीतील मगरींच्याही निदर्शनास आले होते. मगरीही या बैलाच्या आजूबाजूने घात लावून बसल्या होत्या. त्यांचा बैलाच्या दिशेने या मगरींचा पाठलाग सुरू झाला. बैल जसा जसा पुढे जाऊ लागला, तसं मगरी देखील या बैलाच्या मागे जाऊ लागल्या. बैलाला सुद्धा मगरी आपल्या दिशेने येत असल्याचे चाहूल लागली. यानंतर बैलाने या मगरींना चकवा देण्याचे प्रयत्न सुरू केला.
पाण्यामध्ये मग मगर आणि बैल यांच्यात पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. बैल मगरीच्या तोंडी लागणार याची भीती सगळ्यांनाच लागली होती, पण अक्षय आणि त्याच्या इतर नावाडी चालक मित्रांनी नावेतून पाण्यात उतरत बैलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, नाव पाण्यात उतरल्यावर बैल आणखी पुढे जाऊ लागला. कृष्णा नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीराकडे त्याचा प्रवास सुरू झाला, तसा मगरींचाही बैलाच्या मागे पाठलाग सुरूच होता. पाण्यामध्ये मग नावाडी बैल आणि मगर असा थरारक खेळ सुरू झाला होता. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुसऱ्या बाजूला पोहोचलेल्या बैलाला अक्षय व धाडसी नावाडी चालकांनी बाहेर काढले, आणि मगरीच्या तावडीतून या बैलाची सुटका केली. तब्बल चार तास कृष्णेच्या भिलवडीच्या नदीपात्रामध्ये बैल आणि मगरींचा हा पाठ शिवणीचा थरारक खेळ सुरू होता. या दरम्यानच्या काळात अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
इतर महत्वाच्या बातम्या