Jalgaon: ओमायक्रॉनची धास्ती! जळगावात बनावट औषधांची विक्री; प्रशासनाची कारवाई
Counterfeit Medicine: कोरोनाच्या नव्या प्रकारानं ओमायक्रॉनच्या (Omicron) वाढत्या प्रादुर्भावामुळं देशभरात चिंताजनक वातावरण निर्माण झालंय.
Jalgaon: कोरोनाच्या नव्या प्रकारानं ओमायक्रॉनच्या (Omicron) वाढत्या प्रादुर्भावामुळं देशभरात चिंताजनक वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्रातही ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागलीय. याचपार्श्वभूमीवर समाजकंटकांकडून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचं अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर जळगावात रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या बनावट इंजेक्शनची (Counterfeit Medicine) निर्मिती आणि विक्री केली जात असल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी मुंबई अन्न औषध प्रशासनानं जळगाव जिल्ह्यात कारवाई करीत दोन वितरकांवर गुन्हे दाखल केलाय. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती बळकट करणाऱ्या खऱ्या इंजेक्शनच्या नावाखाली बनावट इंजेक्शन बाजारात विकले जात आहेत. पंजाबमधून हे बनावट इंजेक्शन्स मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आयात केले जात आहेत. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मुंबईच्या गुप्तचर विभागानं जळगावात केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आलाय. एफडीए आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात इंजेक्शन जप्त करण्यात आलेत.
कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. कोरोनाचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार, ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. त्यांना कोरोना संसर्गाचा जास्त फटका बसत आहे. अशा स्थितीत याचा फायदा घेत काही लोक सर्रास फसवणूक करत आहेत. अशीच आणखी एक फसवणूक समोर आलीय. शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लोबुसल इंजेक्शनच्या नावाखाली बनावट इंजेक्शन विकल्याची घटना समोर आलीय. या इंजेक्शनचा निर्माता मेसर्स इंटास फार्मास्युटिकलच्या तक्रारीवरून एफडीएच्या इंटेलिजन्स डिव्हिजन युनिटने या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. एफडीएचे आयुक्त परिमल सिंग यांच्या मार्गदर्शनानुसार जळगावात ही कारवाई करण्यात आली आहे. चाळीसगाव, जळगाव येथे एफडीएच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घाटे कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मेसर्स जोगेश्वरी फार्मावर छापा टाकला. या छाप्यामध्ये बनावट इंजेक्शनच्या 220 शिश्यासह इतर औषधी जप्त करण्यात आल्या आहेत. तपासादरम्यान ही सर्व इंजेक्शन चंदीगड येथून आयात केल्याचे निष्पन्न झाले. जोगेश्वरी फार्मा ही इंजेक्शन्स मेसर्स डेराबस्सी, पंजाब येथून घेत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
हेच बनावट इंजेक्शन श्रीक्रीधा इंटरनॅशनल हेल्थकेअरलाही बिलाविना विकले गेले. एफडीएचे आयुक्त परिमल सिंग यांच्या म्हणण्यानुसार, ही सर्व इंजेक्शन्स कोणत्याही बिलांशिवाय मोठ्या प्रमाणात पुरवली जात होती. जळगावात आयात केल्यानंतर हे बनावट इंजेक्शन मुंबईसह महाराष्ट्रात आणि इतर राज्यात बिलाविना पुरवले जात होते. ज्या औषध विक्रेत्यांकडे औषध विक्रीचा परवाना नाही, त्यांनाच हे इंजेक्शन दिले जात होते. या प्रकरणी एफडीएने जोगेश्वरी फार्माचे मालक जितेंद्र प्रभाकर खोडके आणि श्रीक्रीधा इंटरनॅशनल हेल्थकेअरचे मालक सुनील ढाल यांच्याविरुद्ध चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बनावट इंजेक्शन विकणाऱ्या या आंतरराज्य टोळीत कोण-कोण सामील आहे, त्याचा शोध घेतला जात आहे.
ग्लोबुसल सोल्यूशन चा वापर शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीला बळकट करण्यासाठी केला जातो, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असते. हे निरोगी मानवी रक्तापासून बनवले जाते ज्यामध्ये विशिष्ट रक्त पदार्थ (अँटीबॉडीज) उच्च पातळीऔ असतात, जे संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. रोग प्रतिकार क्षमता वाढविणार्या बनावट इंजेक्शन ची विक्री आणि साठवणुक केल्या प्रकरणी जळगाव अन्न औषध प्रशासनाच्या तक्रारी वरून चाळीसगाव शहर पोलिसात दोन जनांचे विरोधात गुन्हे दाखल केले असल्याची आणि या घटनेचा अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिलीय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-