Russia Ukraine War: युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील 100 हून जास्त विद्यार्थी अडकले, सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू
Russia Ukraine War: मराठवाड्यातील 61, अहमदनगर 18, रायगड 22 आणि इतर भागातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.
Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता तिथली परिस्थिती अधिकच भयावह होत आहे. अशा स्थितीत युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून भारतीयांसाठी आज मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली असून सीमा भागाजवळ असलेल्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील जवळपास 100 हून जास्त विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्य प्रशासनाकडून परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मराठवाड्यातील 61 विद्यार्थी युक्रेनमध्ये
मराठवाड्यातील 61 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती आहे. यामध्ये औरंगाबाद 3 , जालना 7, नांदेड 20 ,परभणी 4 , लातूर 21, उस्मानाबाद मधील 6 विद्यार्थांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिलीय. हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिलीय. दरम्यान रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये व्यवसायाच्या निमित्त गेलेल्या आणि तिकडे अडकलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थी आणि नागरिकांची माहिती घेतली जात आहे. त्यात नातेवाईक, पालकांनी प्रशासनाशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे. काही विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तर काही नागरिक व्यवसाय, नोकरीनिमित्त युक्रेनमध्ये आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी देखील युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहेत. रायगड जिल्ह्यातील 22 विद्यार्थी तर रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. सगळे विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणासाठी युक्रेनला गेले आहेत.
गोंदियातील तीन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून पवन मेश्राम, मयूर नागोसे आणि उमेंद्र भोयर अशी त्यांची नावं आहेत. हे तिन्ही विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सप्टेंबर 2021 मध्ये युक्रेनला गेले होते.
बेळगावचे दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी बेळगाव प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येतंय.
दरम्यान, युक्रेनमधील परिस्थिती अधिक गंभीर होत असून त्या ठिकाणची किराणा दुकाने बंद होत आहेत, एटीएम आणि फॉरेक्स कार्ड काम करत नाहीत. एटीएम केंद्रांबाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. तिथल्या भारतीय दूतावासाने जी फ्लाइट बुक केली होती ती रद्द झाली आहे.
भारतीय दूतावासाकडून मार्गदर्शक सूचना जारी
दरम्यान, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या सूचना खालीलप्रमाणे
- विद्यार्थ्यांनी बाहेर पडताना आपल्या कॉन्ट्रक्टरसोबत संपर्कात राहावं.
- सीमा भागाकडे येताना पासपोर्ट, कॅश (अमेरिकी डॉलर), आणि इतर गरजू वस्तू सोबत ठेवव्यात.
- कोव्हिड-19 च्या लसीकरणाचं सर्टिफिक्ट सोबत असावं.
- ट्रॅव्हल करण्यासाठी बाहेर पडताना गाडी किंवा बसवर भारताचा झेंडा लावावा.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha