Russia Ukraine War :  दुसऱ्या महायुद्धात अॅडॉल्फ हिटलरच्या पराभवाला आणि सतराव्या शतकात नेपोलियन बोनापार्टच्या पराभवाला रशियन हिवाळा कारणीभूत ठरला. म्हणूनच रशियन लोक तिथल्या हिवाळ्याला जनरल विंटर किंवा जनरल फोर्स्ट म्हणतात. रशियाच्या इतिहासात जेवढी युद्धं झाली त्या सगळ्या युद्धात त्यावेळच्या वातावरणानं महत्वाची भूमिका निभावली आहे. ही सगळी युद्ध हिवाळ्यात झाली आहेत. सध्या सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धातही हिवाळा ऋतूची भूमिका महत्वाची ठरतेय. हिवाळा ऋतूचा आणि या युद्धांचा इतिहास काय आहे हे  आज आपण जाणून घेणार आहे.


युद्धासाठी अचूक वेळ निवडण्याला खूप महत्त्व आहे. ज्यांना ही वेळ निवडता येते ते विजेते ठरतात आणि ज्यांची वेळ चुकते ते नेस्तनाबूत होतात हा इतिहास आहे. सध्या सुरु असलेल्या रशिया - युक्रेन युद्धासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी निवडलेली निवड त्यामुळेच महत्त्वाची मानली जाते. युक्रेनच्या बाजूने उभ्या राहिलेले युरोपियन देश क्रूड ऑइल आणि गॅससाठी  मोठ्या  प्रमाणात रशियावर अवलंबून आहेत. सध्या रशियात आणि युरोपात हिवाळा सुरु असल्याने घरे, कार्यालये उबदार ठेवण्यासाठी, औद्योगिक उत्पादन चालू ठेवण्यासाठी या देशांना रशियातून येणाऱ्या इंधनाची मोठी गरज आहे. या देशांनी युक्रेनवरील हल्ल्याबाबत आक्रमक भूमिका घेण्याचा प्रयत्न करताच रशियाने रशियाने इंधनाचा पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला. ऐन हिवाळ्यात हे परवडणारं नसल्याने बहुतांश युरोपियन देशांची आक्रमकता कमी झाली. 


 रशिया युरोपला 30 टक्के क्रूड ऑइल आणि 35 टक्के गॅस पुरवतो. युरोपात हिवाळा खूप तीव्र असतो आणि प्रत्येक घराला ऊब मिळण्यासाठी गॅसची गरज असते.  जेव्हा युरोपियन देशांनी रशियाला विरोध सुरु केला तेव्हा पुतिनने एक प्रयोग केला ज्याला वेपनायझिंग ऑफ ऑन रिसोर्सेस असं म्हणतात. पुतिनने इंधनाचा पुरवठा थांबवण्याचा इशारा देताच युरोपियन देशांची भाषा मवाळ झाली. जर्मनी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष रशियात गेले.  पुतिनने युद्धासाठी विंटरची निवड केली आहे कारण युरोपची हिवाळ्यातील ऊर्जेची गरज रशिया भागवतो.  


रशिया आणि युरोपात नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी कडक हिवाळ्याचा असतो. रशिया आणि युक्रेनमध्ये तर अनेकदा तापमान शून्याच्या खाली 40 पर्यंत जातं. हाडे गोठवणारा हाच हिवाळा रशियाच्या मदतीला आल्याचं इतिहासात अनेकदा दिसून आलय. दुसऱ्या महायुद्धाला देखील या रशियन हिवाळ्यानेच एका अर्थाने कलाटणी दिली होती . तोपर्यंत अजिंक्य असलेल्या हिटलरच्या नाझी सैन्याने 22 जून 1941 ला  रशियावर आक्रमण सुरु केलं आणि पुढच्या काही महिन्यात मॉस्कोपर्यंत मुसंडी मारली होती . जर्मन सैन्याने त्यावेळी रशियाचा भाग असलेला युक्रेन प्रांत काबीज केला होता. पण डिसेंबरमध्ये हिवाळ्याला सुरुवात झाली आणि जर्मन सैन्याची जी पीछेहाट सुरु झाली ती हिटलर आणि जर्मनीच्या संपूर्ण पराभवाला कारणीभूत ठरली . 


दुसऱ्या महायुद्धाच पारडं जिथे फिरलं त्या रशियावरील आक्रमणाला हिटलरने ऑपरेशन बारबारोसा हे नाव दिलं होतं . तोपर्यंत अजिंक्य असलेलं हिटलरचं सैन्य तीन महिन्यात रशिया काबीज करेल असा हिटलरचा होरा होता. लेनिनग्राडसह इतरही शहरं काबीज करत नाझी सैन्य मॉस्कोपर्यंत पोहचलंही होतं . आणि त्याचवेळी रशियन हिवाळ्याला सुरुवात झाली . हिटलरचं सैन्य , सैन्याची वाहनं  बर्फात , त्यामुळे तयार झालेल्या चिखलात अडकू लागली . गरम कपडे आणि अन्नावाचून त्यांचे हाल सुरु झाले आणि रशियन फॉऊंजांनी काउंटर अटॅक सुरु केला जो जर्मनीचा पूर्ण पराभव करूनच थांबला . 


 ईस्टर्न फ्रंट म्हणून ओळखली गेलेली ही लढाई मानवाच्या इतिहासातील सर्वात भीषण आणि क्रूर लढाई मानली गेली. या लढाईत जर्मनीने तब्ब्ल 37 लाख सैन्य , सहा लाखांहून अधिक वाहनं आणि तेवढेच घोडे उतरवले होते . त्यापैकी दहा लाख जर्मन सैन्य या लढाईत मारलं गेलं तर रशियन सैन्य आणि नागरिक आणि रशियन सैन्य मिळून तब्ब्ल 49 लाखांहून अधिक जणांचा यात मृत्यू झालं . 


या रशियन हिवाळ्याने हिटलरच्या आधी जगजेत्या नेपोलियन बोनापार्टला देखील गुडघे टेकायला भाग पाडलं होतं . जून 1812 मध्ये नेपोलियनच्या नेतृत्वाखालील दहा लाखांहून अधिक  फ्रेंच सैन्याने रशियावर आक्रमण केलं. पण रशियन हिवाळा नेपोलियनला आडवा आला. अन्न - पाण्यावाचून हाल सुरु झालेल्या नेपोलियनच्या सैन्यावर त्यावर्षी ऑकटोबर महिन्यातच सुरु झालेल्या रशियन हिवाळ्याने निर्णायक घाव घातला आणि नेपोलियनला माघार घावी लागली . 


 याच्याही आधी 1707 मध्ये स्वीडनच्या राजा चार्ल्स याच्या नेतृत्वाखाली रशियन साम्राज्य जिंकून घेण्यासाठी पस्तीस हजार सैन्यानिशी रशियावर आक्रमण केलं होत . दोन वर्ष हे युद्ध चाललं . पण 1709 च्या हिवाळ्यातथकलेल्या स्वीडिश सैन्याचा पराभव झाला आणि त्यासोबतच स्वीडिश राजसत्तेचाही शेवट झाला. रशियन हिवाळा अशाप्रकारे प्रत्येकवेळेस रशियाच्या मदतीला धावून आल्याचं इतिहासात दिसून आलं  आहे. 


  युद्धाचं पारडं अशाप्रकारे रशियाच्या बाजूने झुकवणाऱ्या तिथल्या हिवाळ्याला म्हणूनच जनरल विंटर  किंवा जनरल फॉर्स्ट म्हटलं जातं . आत्ता युक्रेनसोबत सुरु असलेल्या संघर्षातही या हिवाळ्याचा वापर रशिया खुबीने करतोय . पण यावेळी रशियाची गाठ त्याच्यापासूनच फुटून वेगळा झालेल्या युक्रेनशी आहे . त्यामुळे युक्रेनचा प्रतिकार आणि त्यामुळे हे युद्ध जर लांबलं तर हाच हिवाळा रशियाची चिंता वाढवणाराही ठरू शकतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या :