Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हजारो भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीसाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, हरदीप पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, व्हीके सिंग, किरेन रिजिजू आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

Continues below advertisement


या बैठकीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन आणि रशियादरम्यान सुरू असलेल्या तणावाची सद्यस्थिती जाणून घेतली. शिवाय युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत कोणती तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी कोणती रणनीती आखण्यात आली, याबाबत माहिती घेतली.  




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालही एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत पंतप्रधानांनी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी देशांना भेट देण्यास सांगितले होते. याअंतर्गत व्हीके सिंग पोलंडला, किरेन रिजिजू स्लोव्हाकियाला, हरदीप पुरी हंगेरीला तर ज्योतिरादित्य सिंधिया रोमानिया आणि मोल्दोव्हाला जाणार आहेत.


पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संध्याकाळी पहिली उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. यामध्ये त्यांनी रशियन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशात परत आणण्यावर भर दिला. शिवाय हीच सरकारची प्राथमिकता असल्याचे सांगितले होते. 


दरम्यान, युक्रेनमधून आतापर्यंत 1 हजार 400 भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. युद्ध सुरू झाले त्यावेळी सुमारे 20 हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले होते. यानंतर सुमारे आठ हजार भारतीय युक्रेन सीमेवरून शेजारच्या देशांमध्ये पोहोचले आहेत. त्यांना परत आणले जात आहे.


महत्वाच्या बातम्या