एक्स्प्लोर
Advertisement
सत्ता बदलल्यानंतर मागण्या मान्य होतात हा भ्रम: मोहन भागवत
आवश्यक कायदा करा आणि भव्य राम मंदिराचा मार्ग मोकळा करा, असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.
नागपूर: लोक म्हणतात की सत्ता यांची आहे मग राम मंदिर का होत नाही. मात्र सत्ता बदलल्यानंतर मागण्या मान्य होतात हा भ्रम आहे, असा टोला सरसंघचालक मोहन भागवत यांनी लगावला. मात्र त्यांनी यावेळी राम मंदिर उभारण्यासाठी सरकारने आवश्यक कायदा करावा, असं आवाहनही केलं.
राम मंदिर हा श्रद्धेचा मुद्दा आहे. राजकारणामुळे राम मंदिर लांबलं आहे. राम जन्मभूमीवर तिथे मंदिर होतं हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आवश्यक कायदा करा आणि भव्य राम मंदिराचा मार्ग मोकळा करा, असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.
दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विजया दशमी उत्सव साजरा केला. स्वयंसेवकांनी पथसंचलन केल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
तो भ्रम
"आम्ही म्हणतो की सरकारने कायदा करावा, मग राम मंदिर उभारावं. लोक म्हणतात की सत्ता यांची आहे मग राम मंदिर का होत नाही. मात्र हा भ्रम आहे की सत्ता बदलल्यानंतर मागण्या मान्य होतात. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या मागे नाही, ना कधी नव्हतो. आपल्याला सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायातून चांगला पर्याय निवडायचा आहे. कारण श्रीकृष्णही म्हणाले होते की कोणीही 100 टक्के चांगला किंवा 100 टक्के वाईट नसतो", असं मोहन भागवत म्हणाले.
राम मंदिरासाठी कायदा करा
यावेळी मोहन भागवत म्हणाले,“रामजन्मभूमीवर लिहिलेलंही आहे की तिथे मंदिर होतं. त्यामुळे मंदिर असल्याचं सिद्ध झालं आहे.पण काही लोक निर्णय प्रक्रियेत विलंब करत आहेत. हे लोक धार्मिक राजकारण करत आहेत. त्यामुळे सरकारने आवश्यक कायदा करुन राम मंदिराचा मार्ग मोकळा करावा, असं मोहन भागवत म्हणाले.
शिवाय प्रभू राम हे केवळ हिंदूंसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहे, असं भागवत यांनी नमूद केलं.
कोणताच पक्ष सर्वोत्तम नाही
देशातील कोणताही पक्ष 100 टक्के सर्वोत्तम नाही. मात्र जो बरा आहे त्याला निवडा. राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या पक्षाला मतदान करा, असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं.
100 टक्के मतदान करा
जनतेने 100 टक्के मतदान करायलाच हवं. देशाचं नेतृत्त्व कोणी करावं हे लोकांनी ठरवावं. नोटा पर्यायाचा वापर करु नका, त्याचा फायदा सर्वात अयोग्य उमेदवाराला होतो, असं मोहन भागवत म्हणाले.
पक्षीय आणि जाती-पातीचा प्रभाव असलेल्या राजकारणापासून संघ स्थापनेपासूनच वेगळा राहिलेला आहे. उमेदवाराची प्रामाणिकता, राष्ट्रहित आणि राष्ट्रीय एकात्मता हे पाहूनच मतदारांनी मतदान करावं, असं सरसंघचालकांनी सांगितलं.
शहरी नक्षलवाद
यावेळी सरसंघचालकांनी शहरी नक्षलवादावरही भाष्य केलं. सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट करुन देशविरोधी अभियान चालवण्याचं काम नक्षलवादी करत आहेत. अनियंत्रित आणि केवळ नक्षली नेतृत्त्वाला मानत अंध अनुयायांची निर्मिती करणं हे शहरी नक्षलवाद्यांचं काम आहे, असा दावा मोहन भागवत यांनी केला.
राजकीय आंदोलनांमध्ये असेच चेहरे आता घुसत आहेत, जे ‘भारत तेरे तुकडे होंगे’चे नारे देतात. पूर्वी हे नव्हतं, पूर्वी केवळ माओवादच शहरी होता, असं भागवत म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement