शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी रासप नेते रत्नाकर गुट्टेंना अटक
गंगाखेड शुगर लिमिटेड माकणीचे प्रमोटर रत्नाकर गुट्टेंनी यांनी 2014 पासून 2017 पर्यंत सुमारे 29 हजार शेतकऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रं तयार करुन पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एका खाजगी बँकांतून 359 कोटींच कर्ज उचलल्याच आरोप आहे.
परभणी : शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी रासप नेते, उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. गंगाखेड सत्र न्यायालयाने गुट्टे यांचा जामीन फेटाळत त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
सीबीआय औरंगाबाद पथकाने आज गंगाखेड कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं. यावेळी न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळल्याने त्यांची परभणीच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात 7 शेतकऱ्यांनी एकत्रित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ज्यावर न्यायालयाने दिलेल्या चौकशी आदेशनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 29 हजार शेतकऱ्यांच्या नावावर रत्नाकर गुट्टे यांनी परस्पर 359 कोटींचं कर्ज उचलंल होतं.
रत्नाकर गुट्टे यांच्यावर 5 जुलै 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वर्षानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. 28 फेब्रुवारीला गंगाखेड शुगर्स कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग पडवळ यांना अटक करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
गंगाखेड शुगर लिमिटेड माकणीचे प्रमोटर रत्नाकर गुट्टेंनी यांनी 2014 पासून 2017 पर्यंत सुमारे 29 हजार शेतकऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रं तयार करुन पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एका खाजगी बँकांतून 359 कोटींच कर्ज उचलल्याच आरोप आहे.
गंगाखेड तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना कर्जाची गरज पडली. तेव्हा शेतकऱ्यांना सीबील रिपोर्टमध्ये आपल्या नावावर कर्ज असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मयत लोकांच्या नावे कर्ज घेतल्याचंही चौकशीत उघड झालं आहे.
फसवल्या गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, अकोला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा, तर फसवलेल्या बँकांमध्ये परभणी सिंडीकेट बँक, युको बँकेच्या गंगाखेड, लातूर आणि नांदेडच्या शाखा, बँक आँफ इंडियाची अंबाजोगाई शाखा, आंध्र बँकेची नागपूर शाखा, युनाटेड बँकेची नागपूर शाखा आणि रत्नाकर बँक मुंबई या बँकांचा समावेश आहे.
कोण आहेत रत्नाकर गुटे?
रत्नाकर गुट्टे परळी तालुक्यातल्या दैठणाघाटचे रहिवाशी आहेत. परळीच्या थर्मल प्लँटवर मजूर म्हणून काम करत होते. थर्मल स्टेशनमधली छोटी मोठी कामं घ्यायला सुरुवात केली. तिथून पुढे गुट्टे मोठे कंत्राटदार झाले. सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या माध्यमातून गुट्टेंनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली आहेत.
रत्नाकर गुट्टे हे अजित पवारांचे निकटवर्तीय होते. गंगाखेड शुगर या कारखान्याचा शुभारंभही शरद पवार यांनी केला होता. रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुधामती गुटे या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस होत्या. सध्या रत्नाकर गुट्टे पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जात असले तरी गुट्टे सध्या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षात आहेत. मागची विधानसभा गुट्टेनी जानकरांच्या पक्षातर्फे लढली होती.