(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : दादांनी कर्जतमध्ये सभा घेतली असती तर नक्कीच वर-खाली झालं असतं; रोहित पवारांची स्पष्ट कबुली
Rohit Pawar Meet Ajit Pawar : कराडच्या प्रीतीसंगमावर आज अजित पवार आणि रोहित पवार आमने सामने आले होते. त्यावेळी थोडक्यात वाचलास असा मिश्कील टोला अजितदादांनी लगावला
सातारा : तुझ्या मतदारसंघात माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, थोडक्यात वाचलास असा मिश्कील टोला अजितदादांनी रोहित पवारांना लगावला होता. त्यावर आता रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिला. अजितदादांनी आपल्या मतदारसंघात सभा घेतली असती तर वर-खाली होऊ शकलं असतं, किंवा उलटंही होऊ शकलं असतं असं रोहित पवार म्हणाले. अजितदादांचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले, त्यांचे अभिनंदन केलं असल्याचंही रोहित पवारांनी सांगितलं.
कराडच्या प्रीतीसंगमावर आज अजित पवार आणि रोहित पवार आमने सामने आले. यावेळी काका पुतण्याची अनोखी केमिस्ट्री एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात चित्रीत झाली. रोहित पवार समोर आलेले पाहून अजित पवारांनी त्यांना हात मिळवत दर्शन घे काकाचं असं सांगितलं. रोहित पवारांनीही लगेच अजित पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले.
त्यानंतर अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्कील टोला मारला. थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं अजितदादांनी रोहित पवारांच्या छातीवर थाप मारत म्हटलं. रोहित पवारांनीही दादांचा हा टोला हलकेच घेतला. त्यानंतर एबीपी माझाने तातडीने रोहित पवारांशी या भेटीबाबत विचारलं. त्यावर अजित पवारांची मतदारसंघात सभा झाली असती तर वरखाली झालं असतं अशी कबुलीही रोहित पवारांनी दिली. तर आपण असं बोललोच नाही असं दादा म्हणाले.
काकांच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले की, "अजित पवार माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे. नक्कीच अजित पवारांनी सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे. चांगली गोष्ट आहे, मी त्यांचे अभिनंदन देखील केलं."
आपल्याला कट कारस्थान करून पाडल्याचा राम शिंदेंचा आरोप
आपल्याला कट कारस्थान करून कर्जत जामखेडमध्ये पाडलं असा गंभीर आरोप भाजपच्या राम शिंदे यांनी केलाय. अजित पवारांच्या सभा मागितल्या तरी सभा दिल्या नाहीत. त्यांना या संदर्भात मेसेजही केला होता असं राम शिंदे म्हणाले. राम शिंदे यांनी या संदर्भातला मेसेजही एबीपी माझाशी बोलताना दाखवला. पैशांचा वारेमाप वापर झाला, कट रचून पराभव करणं दुःखदायक आहे असं राम शिंदे यांनी म्हटलंय. कराड इथे प्रीतीसंगमावर अजित पवार रोहित पवार भेटीत अजितदादांनी केलेल्या वक्तव्यानंतर राम शिंदे यांनी हा आरोप केला.
ही बातमी वाचा: