एक्स्प्लोर
रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून इच्छुक, विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या जिल्हानिहाय मुलाखती सुरु
रोहित पवारांनी कर्जत-जामखेड मतदार संघातून मुलाखत दिल्यानं जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे आता पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलं आहे.

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदार संघातून इच्छुक असल्याचे स्पष्ट केलं. कर्जत-जामखेड पणन मंत्री राम शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात आता रोहित पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. रोहित पवार यांच्या बरोबरच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मंजुषा गुंड यांनी देखील मुलाखत दिली आहे. मात्र रोहित पवारांनी कर्जत-जामखेड मतदार संघातून मुलाखत दिल्यानं जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे आता पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलं आहे. सांगलीत उमेदवारीसाठी भाऊगर्दी कमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सांगलीमध्ये पार पडल्या. पक्षाच्या राष्ट्रवादी कार्यालयात जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदार संघासाठी मुलाखतीत घेतल्या. यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीबाबत विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येक मतदारसंघातून दिग्गज नेत्यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यांची उमेदवारीसाठी भाऊ गर्दी व्हायची. विशेष म्हणजे मुलाखतीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त व्हायचं. उमेदवारी कोणाला द्यायची यावरुन राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्या समोर पेच निर्माण व्हायचा. पण यंदाच्या या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान अशी कोणती स्थिती आज जाणवली नाही. आज तुरळक प्रमाणात गर्दी दिसून आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र यावेळी प्रदेश कार्यालयाकडून कोणतीही शक्ती प्रदर्शन न करता केवळ उमेदवारांनी मुलाखती देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असं सांगण्यात आलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























