(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संत ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमीत श्री क्षेत्र देवगड दिंडीचा पहिला रिंगण सोहळ संपन्न
राज्यात शिस्तप्रिय असा नावलौकीक असलेली श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण संत ज्ञानेश्वरांची पुण्यभूमी असलेल्या नेवासे नगरीत मोठ्या उत्साहात पार पडले.
शिर्डी : संत ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमीत श्री क्षेत्र देवगड दिंडीचा पहिला रिंगण सोहळ आज संपन्न झाला. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे श्री क्षेत्र देवगडहून दिंडीने प्रस्थान केलेल्या श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी आज दुपारी नेवासा बस स्थानकात "याचि डोळा, याचि देही''' पहिले रिंगण अनुभवलं.
देवगड दिंडीचा ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नेवासे कर्मभूमीत टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली-तुकाराम, माऊली-माऊली जयघोषात पंढरीच्या ओढीने निघालेला वैष्णवांचा मेळा आज श्री क्षेत्र नेवासे नगरीत पोहोचला. राज्यात शिस्तप्रिय असा नावलौकीक असलेली श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण संत ज्ञानेश्वरांची पुण्यभूमी असलेल्या नेवासे नगरीत मोठ्या उत्साहात पार पडले.
नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. रिंगणात अश्वांचं आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पालखी सोहळ्यांसोबत चालणाऱ्या अश्वांनी डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच गोल रिंगण पूर्ण करत, विणेकरी, झेंडेवाले धावले.
हरिदासांनी प्रदक्षिणा पूर्ण करून रिंगण सोहळ्यास चैतन्य प्राप्त करुन दिलं. बदामबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल गाण्यावर नृत्य सादर केले. समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांने झंज पथकाचे सादरी करुन डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा बघितल्यानंतर विठूराया प्रती या वारकऱ्यांच्या भक्तीचा अनुभव येतो.