एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri Refinery : रिफायनरीसाठी समर्थक देखील अॅक्शन मोडमध्ये; शिवसैनिकाच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
यापूर्वी रिफायनरीच्या बाजुनं भूमिका घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली गेली आहे. त्यामुळे रिफायनरीचे समर्थन करत असलेल्या शिवसैनिकांविरोधात पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागणार आहे.
रत्नागिरी : कोकणात रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरणाचा काराखाना व्हावा कि नाही, याबाबतच्या घडामोडी पुन्हा एकदा वेगानं घडत आहे. राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगाव या ठिकाणी प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेवर रिफायनरीच्या उभारणीबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर लगेगच विरोधकांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. प्रकल्प विरोधी समितीची स्थापना झाली. विरोधाचे ठराव देखील झाले. पण, समर्थकांकडून अद्याप तोडीस तोड असं उत्तर आलं नव्हतं. अखेर रिफायनरी समर्थककांकडून याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रिफायनरीच्या विरोधकांनंतर आता समर्थक देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बुधवारी संध्याकाळी उशिरा रिफायनरी समर्थक समितीची स्थापना करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे कट्टर शिवसैनिक समजले जाणारे आणि माजी विभागप्रमुख असलेले नाटे गावचे रहिवाशी डॉक्टर सुनिल राणे या समितीच्या अध्यक्षपदी आहेत. या समितीमध्ये 36 जण असून देवाचे गोठणे - सोलगाव - नाटे दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता समर्थक देखील आर या पारची लढाई लढण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसून येत आहे. बारसू - सोलगावमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी सध्या हि समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात रिफायनरीच्या प्रकल्पावरून कोकणात वाचावरण तापलेलं दिसून येणार आहे.
पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार?
यापूर्वी रिफायनरीच्या बाजुनं भूमिका घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली गेली आहे. अगदी काही दिवसांपूर्वी राजापूरच्या नगरसेविकेनं ठरावाच्या बाजुनं मतदान केल्यानं तिला देखील सारख्याच कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे रिफायनरीचे समर्थन करत असलेल्या शिवसैनिकांविरोधात पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागणार आहे.
समर्थकांचं म्हणणं काय?
कोकणात रोजगार नाहीत. इथला माणूस गावाच्या बाहेर जाऊन राबराब राबतो. रिफायनरी प्रकल्प आल्यास राजापूर तालुक्याचा देखील मोठा विकास होईल. रोजगार मिळेल. लोकांच्या जीवनमानात मोठा परिणाम होईल. या प्रकल्पाबाबत काही शंका असल्यास त्यावर चर्चा करू. कंपनीशी तसा करार करू. त्यानंतरच या प्रकल्पाला संमती देऊ. पण, चर्चा होणे गरजेचं आहे. आम्ही खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागत आहोत. पण, आम्हाला वेळ दिला जात नाही. मग, यावर तोडगा कसा निघणार? हा प्रकल्प विनाशकारी असेल हे पटलं तर आम्हीच त्याला विरोध करू. किती झाडं जाणार आहेत? किती नागरिकांचं विस्थापन होणार आहे? हे जाणून घेणे देखील गरजेचे आहे. पण, अर्धवट माहिती आणि चर्चा न करता हा प्रकल्प गमावणे हे परवडणारे नाही अशी प्रतिक्रिया समर्थक देतात. शिवाय यापुढे प्रकल्पाला समर्थन कसं वाढत आहे, देखील कळेल अशी पुष्टी देखील करतात.
प्रकल्पाला समर्थन वाढतंय?
यापूर्वी नाणार इथं होणाऱ्या प्रकल्पाला देखील मोठा विरोध झाला होता. त्यानंतर शिवसेनेनं या प्रकल्पाची अधिसुचनाच रद्द केली होती. दरम्यान, हा प्रकल्प हवा कि नको याबाबत एबीपी माझानं खासगीत काही शिवसैनिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी 'साहेब आम्ही कट्टर शिवसैनिक. पक्षाची भूमिका ही आमची भूमिका. पण, प्रकल्पाबाबत विचाराल तर प्रकल्प व्हावा असं आम्हाला वाटतं. गावात काय आहे आमच्या? जर आमचं घर दार जाणार नसेल. लोकांना याचा त्रास होणार नसेल. तर किमान चर्चा करायला काय हरकत आहे? अहो आज मेडिकल सुविधेपासून बऱ्याच गोष्टी नाहीत. त्यावर कोण बोलणार? बरं प्रकल्प नको तर ठिक, पण मग आम्हाला सुविधा तरी द्या. आमच्या पोरांनी आम्ही केली तिच कामं करायची का? पण, आम्ही हे उघडपणे बोलू शकत नाही. प्रकल्पाचे फायदे - तोटे लक्षात घेत, त्यावर चर्चा करत एकदा काय तो निर्णय घ्या. साहेबांच्या मनात पण प्रकल्प व्हावा असं आहे. पण ते उघडपणे बोलत नाहीत' अशी प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेची भूमिका काय?
दरम्यान, प्रकल्पाच्या नवीन जागेबाबत आम्ही खासदार विनायक राऊत यांना देखील प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी 'शिवसेनेनं आपली भूमिका यापूर्वी जाहीर केलेली आहे. आमचा प्रकल्पाला विरोध आहे. स्थानिकांना हा प्रकल्प नको असेल तर आम्ही तो लादणार नाहीत. लोकांसोबत आम्ही आहोत. उद्या स्थानिकांची भूमिका तीच आमची भूमिका. सध्या प्रकल्पाच्या नवीन जागेबाबत कोणतीही चर्चा नाही' अशी प्रतिक्रिया दिली.
शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश
पक्ष प्रकल्पाबाबात ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे जवळपास 60 ते 70 शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश केलेले शिवसैनिक हे रिफायनरी समर्थक असून त्यांनी प्रकल्प व्हावा यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आगामी काळात आणखी शिवसैनिक भाजपमध्ये दाखल होतील असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
काही गावांचा रिफायनरी समर्थनार्थ ठराव
राजापूर तालुक्यातील काही गावांनी प्रकल्पाच्या बाजूनं ठराव केला आहे. यामध्ये राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील पाचल ग्रामपंचायतीचा देखील समावेश आहे. तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून या गावची ओळख आहे. शिवाय, राजापूर, नगरपरिषदेनं देखील प्रकल्प व्हावा असा ठराव केला आहे.
रिफायनरी विरोधात ठराव
दरम्यान, राजापूर तालुक्यातील सोलगाव आणि शिवणे खुर्द या गावांनी रिफायनरीविरोधात ठराव केला आहे. यामध्ये आम्हाला एमआयडीसी आणि प्रदुषणकारी रिफायनरी नको असा उल्लेख केलेला आहे. यापूर्वी देवाची गोठणे या गावानं देखील रिफायनरीविरोधात ठराव केला आहे. तसेच रिफायनरी विरोधात समितीची देखील स्थापना करण्यात आलेली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement