नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी 'इंग्लिश मीडिअम' जुगाड; विद्यार्थी परजिल्ह्यात, पेपर लिहिले स्थानिक विद्यार्थ्यांनी
केंद्रीय नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा याकरता परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जानशी या गावच्या शाळेत इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश देण्यात आला. पण, प्रत्यक्षात हे विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले नाहीत. उलट त्यांचे पेपर हे स्थानिक विद्यार्थ्यांकडून लिहिले गेले आहेत.
रत्नागिरी : आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यात गैर देखील काहीच नाही. पण, त्यासाठी काही अटी आणि नियमांना बगल देत कशा प्रकारे नानाविध प्रकार करतात याचं एक उत्तम उदाहरण देणारा चित्रपत्र म्हणजे इम्नान खानचा इंग्लिश मीडिअम. आपल्या पाल्यासाठी इम्रान खान आणि पत्नी काय काय उचापती करतात या गोष्टी चित्रपट पाहिलेल्या सर्वांच्या डोळ्यासमोर एव्हाना उभ्या देखील राहिल्या असतील. असाच काहीसा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जानशी या गावच्या शाळेत उघड झाला आहे. केंद्रीय नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा याकरता परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जानशी या गावच्या शाळेत इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश देण्यात आला. पण, प्रत्यक्षात हे विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले नाहीत. उलट त्यांचे पेपर हे स्थानिक विद्यार्थ्यांकडून लिहिले गेले आहेत. या साऱ्या प्रकरणाची दखल आता जिल्हापरिषद आणि जिल्हाधिकारी यांनी देखील घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत विद्यार्थ्यांच्या रहिवासी प्रमाणपत्र तपासाबाबत जिल्ह्यातील सर्व तहसिलदार आणि गटशिक्षण अधिकारी यांना आदेश दिले आहेत. जानशी गावच्या साने गुरूजी महाविद्यालयात हा सारा प्रकरा घडल्याचा आरोप पालकांनी केला असून त्याबाबत आता तपास देखील सुरु झाला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासगुणांना वाव मिळावा. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशानं प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. सन 2006पासून रत्नागिरी जिल्ह्यात देखील ही शाळा आहे. सहावी, नववी आणि अकरावीकरता यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. दरम्यान, सध्यस्थितीत राजापूर तालुक्यातील पडवे गावात हे नवोदय विद्यालय आहे. जिल्ह्याकरता 70 विद्यार्थ्यांचा कोटा यामध्ये आहे. या शाळेत प्रवेश मिळवण्याकरता विद्यार्थी जिल्ह्यातील शासनमान्यताप्राप्त शाळेत पाचवी उतीर्ण असावा अशी अट आहे. हीच बाब लक्षात घेत परजिल्हातील विद्यार्थी पाचवीकरता जिल्ह्यातील काही शाळांमध्ये प्रवेश घेतात. पण, प्रत्यक्षात मात्र ते विद्यार्थी शाळेत हजर राहत नाहीत. वर्षभर त्यांची हजेरी रत्नागिरीतील प्रवेश घेतलेल्या शाळेत दाखवली जाते. काही ठिकाणी इतर विद्यार्थ्यांकडून त्यांचे पेपर लिहून घेतले जातात. याकाळात वर्षभर हे विद्यालय नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत रत्नागिरी जिल्ह्यात पाचवी उत्तीर्ण झाल्याचं दाखवत आपला सहावीकरता नवोदय विद्यालयाचा प्रवेश सुकर करतात. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना मागे राहावं लागतं. असाच प्रकार जानशी गावच्या साने गुरूजी महाविद्यालयात घडल्याचं आरोप पालकांनी केला आहे.
'जर परजिल्ह्यातील विद्यार्थी येत अशा प्रकारे वर्षभर शाळेत गैरहजर राहणार असतील. त्यांचे पेपर आमची मुलं लिहिणार असतील, तर याला काय म्हणणार? या साऱ्याच्या मागे कोण आहे? हे कुणाच्या संगनमतानं होत आहे? असा सवाल साक्षी जैतापकर या पालकानं केला आहे. दरम्यान, आम्ही या मुलांचे पेपर सरांच्या सांगण्यावरून लिहिल्याची कबुली काही विद्यार्थ्यांनी 'एबीपी माझा'कडे दिली आहे. या साऱ्या प्रकरणात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यांनी याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. अशी माहिती देखील पालकांनी यावेळी 'एबीपी माझा'कडे दिली.
"यासाऱ्या प्रकरणात आम्ही तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. आम्हाला प्रथमदर्शनी ज्या गोष्टी दिसल्या त्यानुसार हि चौकशी सुरु आहे. याबाबत अहवाल लवकरच येईल. त्यानंतर पुढील कारवाई होईल.", अशी प्रतिक्रिया रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.
शाळेचं म्हणणं काय? मुख्याध्यापकांची धमकी
याबाबत शाळेचे मुख्याध्यापक बलवंत सुतार यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना याबाबत विचारले असता 'चौकशीतून सारं समोर आलं की, मी काय ते बोलेन' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच बातमीच्या वार्तांकनासाठी गेलेल्या 'माझा'च्या प्रतिनिधींना तुम्ही याठिकाणाहून चालते व्हा. शाळेच्या आवारात तुम्ही आलातच कसे? मी पोलिसांना बोलावतो अशी उद्दामपाणाची भाषा केली. शाळेच्या या विषयाची जाणीव त्यांना करून दिल्यानंतर सुतार यांनी थेट माझाच्या कॅमेरामन आणि प्रतिनिधींशी अरेरावीची भाषा केली. या साऱ्या प्रकरणात पोलिसांशी देखील संवाद साधावा लागला. घडल्या प्रकाराबाबत पालकांनी देखील आपला संपात व्यक्त केला.
'44 विद्यार्थी परजिल्ह्यातील'
दरम्यान, यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील नवोदयच्या 70 जागांपैकी 44 जागा या परजिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. काही संस्था याबाबत काम आहेत. याची माहिती आम्हाला मिळाली आहे. यासाऱ्या प्रकरणाची चौकशी होईल. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने यांनी 'एबीपी माझा'कडे दिली आहे.
नवोदय विद्यालय प्रवेशासाठी काय आहेत अटी?
सहावीच्या प्रवेशासाठी खालील अटी
1) सन 2020-2021मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय/ शासनमान्य शाळेत इयत्ता पाचवीमध्ये संपूर्ण शैक्षणिक वर्ष शिकत असलेला विद्यार्थी 2) जन्म तारीख 01-05-2008 ते 30-04-2012 मधील असावी 3) इयत्ती तिसरी, चौथी आणि पाचवी शासकीय/ शासनमान्य शाळेतून सलग उत्तीर्ण असावा 4) 75 टक्के ग्रामीण आणि 25 टक्के शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश