तब्बल पाच तासानंतर 83 वर्षीय आजोबांची सुटका; पुराच्या पाण्यात रंगला बचावाचा थरार
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे गावातील गडनदीच्या पात्रात तब्बल पाच तासांचा बचावाचा थरार रंगला. यात 83 वर्षीय आजोबांची सुटका करण्यात स्थानिकांना यश आलं आहे.
रत्नागिरी : पुराच्या पाण्यात तब्बल पाच तास राहिल्यानंतर कुणी सुखरूप परत आला हे सांगितल्यास तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे गावातील गडनदीच्या पात्रात तब्बल पाच तासांचा बचावाचा हा थरार रंगला होता. यावेळी गावकरी, पोलिस आणि धाडसी तरूणानं दाखवलेल्या प्रंसगावधानमुळे 83 वर्षीय आजोबा आज सुखरूप आपल्या घरी गेलेत. पण, बचावाचा थरार पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर रोमांच आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय, ग्रामस्थ, पोलीस आणि आजोबांना पुराच्या पाण्यातून आपल्या जीवाची बाजी लावत वाचवणाऱ्या तरूणाला देखील तुम्ही 'सॅल्यूट' ठोकल्याशिवाय राहणार नाही.
'काळ आला होता पण वेळ नाही' ही म्हण आपणा सर्वांना ठावूक आहे. याचाच प्रत्यय रत्नागिरी जिल्ह्यातील 83 वर्षीय आत्माराम राजाराम घाग यांना आला आहे. राजाराम घाग यांचं मुळगाव चिपळूण तालुक्यातील नायशी. पण, काही कामानिमित्त राजाराम घाग हे संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे गावी आले होते. सकाळी सात वाचता ते गडनदी किनारी लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी दुर्दैवानं त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागले. पण, त्याचं नशीब बलवत्तर होते. त्यामुळेच नदीतील एका झुडपाचा त्यांना आधार मिळाला. परिणामी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात असलेल्या आजोबांना तब्बल पाच तासानंतर वाचवण्यात यश आलं आहे.
...पाच तासांचा तो थरार
गडनदीच्या प्रवाहासोबत वाहत जात असलेला कुणीतरी नदीतील झुडपाच्या साहाय्यानं अडकून पडला असून त्याला मदतीची गरज आहे. ही बाब तुषार जड्यार यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी लगेगच आसपासच्या नागरिकांना बोलावणे धाडले. शिवाय पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान आत्माराम घाग पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात होते. त्यामुळे तातडीनं रेस्क्यू करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या. मोठा आणि मजबूत असा दोरखंड आणला गेला. त्यानंतर माखजन गावातील पट्टीचा पोहोणारा तरूण अमित कुंभारनं गडनदीच्या पात्रात उडी घेण्याचं धाडस दाखवलं. दोरखंडांचं एक टोक किनाऱ्यावरील झाडाला तसेच लोकांच्या हातात दिलं गेलं. तर एक टोक 83 वर्षीय आत्माराम घाग यांच्या कंबरेला बांधलं गेलं. अशा रितीनं पुराच्या पाण्यात अकडलेल्या 83 वर्षीय आत्माराम घाग यांना ओढत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावर आणलं गेलं. यावेळी काळंबुशी, कोंडिवरे गावचे नागरिक आणि पोलिस खात्यानं देखील याकामी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आत्माराम घाग यांना वाचवण्यात आलं.