एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोकणासह राज्यभरात गौरीचं जल्लोषात आगमन
गौरीला आज भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, अनेक घरात गोड नैवेद्यही दाखवला जातो. तर कोकणातील अनेक गावात गौरीला उद्या 'तिखटा' म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात.
रत्नागिरी : कोकणासह राज्यभरात आज सर्वत्र गौराईचं जल्लोषात आगमन होतं आहे. भाद्रपद महिन्याच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं. कोकणातील अनेक गावागावात आजही पारंपारिक पद्धतीने रितीरिवाज पाळत गौराईला घरी आणलं जातं.
कोकणात गौरीला ग्रामीण भाषेत 'गवर' असंही संबोधलं जातं. घरातील महिला घराजवळच्या पाणवठ्यावर गौराई आणण्यासाठी जातात. नदीच्या पात्रातील सात दगड वेचून त्यांची नदीच्या किनाऱ्यावरच पूजा केली जाते. मग हे दगड, फुलोरा आणि गौरीचा मुखवटा वाजतगाजत घरी आणला जातो. नदीवरुन घरापर्यंत येईपर्यंत या महिला एकमेकींशी बोलत नाहीत.
या गौरीचं घरात आगमन होताच गणपतीच्या शेजारी बसवण्यासाठी लाकडात कोरलेल्या गौराईच्या पूर्णाकृती मूर्तीला सजवलं जातं. बहुतांश वेळा गौरीचा मुखवटा लावून तिचं पूजन केलं जातं. पण कोकणातील अनेक गावातील घरांमध्ये लाकडाच्या पूर्णाकृती गौरी असतात. दरवर्षी या गौरींना नव्या वस्त्रालंकारानी सजवलं जातं. अनेक घरांमध्ये गौरीचं वर्षानुवर्षांच्या खऱ्या सोन्याचे दागिनेही असतात. गौरी आगमनाची पारंपरिक गाणी म्हणत गौरींना सजवलं जातं.
वस्त्रालंकारानी-आभूषणानी सजवलेल्या या गौरीला आज भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, अनेक घरात गोड नैवेद्यही दाखवला जातो. तर कोकणातील अनेक गावात गौरीला उद्या 'तिखटा' म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात. कोकणात गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक घरात 'तिखटा सण' साजरा होतो. घराच्या ओटी-पडवीत गौरीची ही मूर्ती सजली की दरातील माप ओलांडत तिला गणपतीच्या मखरात नेऊन पुजलं जातं.
गौरीच्या आगमनानंतर घरात झिम्मा-फुगडी, बस-फुगडी असं महिलांचे खेळ रात्रीपर्यंत सुरु राहतात. घरी आलेल्या माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते. संपूर्ण कोकणात गणरायापाठोपाठ आज झालेल्या गौरीच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement