(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करणार : पालकमंत्री दत्तात्रय भरणे
आयसीएमआरच्या गाईडलाईन्सनुसार ही रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहेत. या टेस्ट करण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि महानगरपालिका एकत्रितरित्या आराखडा तयार करणार असून यासाठी पोलीस आयुक्तालयाला विशेष मनुष्यबळ पुरविले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सोलापूर : सोलापुरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील सुमारे एक लाख नागरिकांची तर ग्रामीण भागातील 50 हजार नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. त्याचबरोबर शहरात तुर्तास लॉकडाऊन केले जाणार नाही, अशी माहिती देखील त्यांनी या वेळी दिली.
सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरात सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये सुमारे एक लाख नागरिकांना वेगवेगळे आजार (को-मॉर्बिड) असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ग्रामीण भागातील 50 हजार नागरिकांना वेगवेगळे आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे वेगवेगळे आजार आहेत. या सर्व नागरिकांची पुढील 7 दिवसांत रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार असून यामुळे व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. अवघ्या अर्ध्या तासात हा अहवाल प्राप्त होणार आहे. आयसीएमआरच्या गाईडलाईन्सनुसार ही रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहेत. या टेस्ट करण्यासाठी शहरात पोलीस आयुक्तालय आणि महानगरपालिका एकत्रितरित्या आराखडा तयार करणार आहेत. तर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी कार्यालय आणि ग्रामीण पोलीस दल या साठी आराखडा तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या चाचणीत पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांना आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवले जाणार आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडीत करण्यात निश्चित यश येईल,असा विश्वास देखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. दरम्यान सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती देखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सोलापुरात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे काही दिवसांपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना लॉकडाऊन करु नये यासाठी निवेदन देखील दिले होते.
Rural News | तोंड आवरा अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू, पडळकरांविरोध राष्ट्रवादीचं आंदोलन | माझं गाव माझा जिल्हा