हितेंद्र ठाकूर यांचं मन वळवण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न, शरद पवारांनंतर मुख्यमंत्र्यांचा फोन
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतासाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असतानाच राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांचं मन वळवण्यासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू आहेत. आज हितेंद्र ठाकूर यांच्याशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी फोनवरून चर्चा केली आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतासाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात शिवसेना खासदार विनायक राऊत, राजन विचारे, कॉंग्रेसचे माजी खासदार अशोक मोहळ, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचा समावेश होता. यावेळी अंकुश काकडे यांच्या फोनवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकूर यांच्यासोबत चर्चे केली. तर विनायक राऊत यांच्या फोनवरुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ठाकूर यांच्यासोबत चर्चा केली. विनायक राऊत आणि अंकुश काकडे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत वरिष्ठांची चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भाजपकडून देखील हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. शनिवारी भाजपचे उमेदवार धनंजय महाडीक यांनी ठाकूर यांची भेट घेतली. तर रविवारी शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, खासदार राजन विचारे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी भाजप नेते गिरीश महाजन यांनी भेट घेतली होती. परंतु, राज्यसभेच्या मतदानाला आता एक दिवसाचा अवधी राहिला असून आपलं मत कुणाला हे अद्याप ठाकूर यांनी स्पष्ट केलं नाही.
महत्वाच्या बातम्या