राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक
राजू शेट्टी यांची पदयात्रा संध्याकाळी नृसिंहवाडी येथे पोहोचली. त्यावेळी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी तेथे सरकारच्या वतीने त्यांना निवेदन दिलं.
कोल्हापूर : पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि इतर काही मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पदयात्रा काढत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची दखल आता सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राजू शेट्टी यांना बैठकीचे निमंत्रण आहे. उद्या 3 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहेत. राजू शेट्टी यांची पदयात्रा संध्याकाळी नृसिंहवाडी येथे पोहोचली. त्यावेळी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी तेथे सरकारच्या वतीने त्यांना निवेदन दिलं.
कालपर्यंत साधा तलाठी भेटायला आला नाही. पण आज आंदोलनाचा अंदाज आल्यावर धावपळ सुरू झाली. आता मुख्यमंत्र्यांनी बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. उद्याच्या बैठकीत निर्णय झाला नाही तर रस्ते आडवावे लागतील. मंत्र्यांना गाव बंदी करावी लागेल. तरी देखील निर्णय घेतला नाही तर प्रत्येक गावातील नद्यांमध्ये जलसमाधी आंदोलन केले जाईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.
मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत मात्र पुरग्रस्तांना द्यायला पैसे नाहीत
मुख्यमंत्र्यानी केंद्राकडून होणाऱ्या अन्यायवर आवाज उठवावा. आम्ही तुमच्यासोबत येऊ. केंद्रान आपत्ती निवारण निधीमधून राज्याला भरघोस निधी द्यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. पूरग्रस्तांना द्यायला राज्याकडे पैसे नाहीत म्हणतात मग मंत्र्यांची दालनं कशी सजली आहेत, जाऊन पहा. मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत मग पुरग्रस्तांना द्यायला पैसे कसे नाहीत असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय पथक पाहणीसाठीही आलं नाही
यंदा आलेला हा पूर शतकातील मोठा पूर होता. दीड महिना लोटला तरी अजून केंद्रीय पथक पाहणीसाठी आलेलं नाही. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे पूरग्रस्त त्रस्त आहेत. आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मग आमचा जगून काय उपयोग. म्हणून आम्ही आज जलसमाधी घ्यायला आलो होतो.
पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संघर्ष करावा लागेल. माणसाने निसर्गाचे लचके तोडले आता निर्सग त्याचं काम करत आहे. पूर्वी एक दोन दिवसात पूर येऊन जायचा आता 15 दिवस पूर जात नाही. या पूर परिस्थितीला भराव टाकलेले पूल कारणीभूत ठरत आहेत, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं.
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढलेल्या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांना 2019 च्या निकषांप्रमाणे मदत मिळावी यासाठी राजू शेट्टी यांनी हे आंदोलन उभं केलं आहे. आज 4 वाजेपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर जलसमाधीचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता.