साखर संघासह कारखानदारांचे शेतकऱ्यांच्या विरोधात कारस्थान, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले निकाल शेतकऱ्यांच्या बाजूनेच लागणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपी च्या मुद्यावरुन राज्य साखर संघ आणि साखर कारखानदारांवर जोरदार टीका केली आहे.
Raju Shetti : एकरकमी एफआरपी (FRP) कायम करण्याच्या उच्च न्यायालयातील याचिकेवरील निर्णय अंतिम आहे. अशातच आज राज्य साखर संघाने दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर मुदत मागवण्यात आली आहे. राज्य साखर संघाकडून (State Sugar Association) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताठात माती कालवण्याचा उद्योग केला असल्याची खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली.
एक रक्कमी एफआरपीच्या कायद्यात बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी राज्य सरकारच्या अनागोंदी कारभारावर माननीय उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आज या याचिकेवर निकाल लागण्याची शक्यता होती. मात्र राज्य साखर संघाने तीन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेमध्ये म्हणने मागण्यास मुदत मागितल्याने मा. उच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात मंगळवारी सुनावणी ठेवली आहे. वास्तविक पाहता राज्य साखर संघाकडून तीन वर्षांपूर्वी हस्तक्षेप याचिका दाखल केल्यानंतर वेळोवेळी झालेल्या सुनावणी दरम्यान आपली बाजू मांडणे गरजेचे होते. मात्र गेल्या तीन वर्षात राज्य साखर संघाकडून कोणताही पदाधिकारी , अधिकारी ,वकील अथवा कर्मचारी यांनी सुनावणीस ऊपस्थित राहण्यास जाणीवपुर्वक टाळल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
राज्य साखर संघाने कारखानदारीच्या हितासाठी आजपर्यंत काहीच केलं नाही
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसातून वर्षाला पाच -पाच कोटी रूपयांची वर्गणी गोळा करून स्वर्गीय वसंतदादा यांच्या कृपेने पोसलेल्या राज्य साखर संघाने कारखानदारीच्या हितासाठी आजपर्यंत कोणतेच पाऊल उचलले नाही. राज्यातील सहकारी साखर कारखाने कवडीमोल दराने विकले जात असताना त्याचा कधी चौकशी अहवाल तयार केला नाही , साखर कारखान्याकडून होत असलेल्या भरमसाठ खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी कधी ऊपाययोजना राबविण्यात आली नाही. दोन कारखान्यांच्या मधील अंतराचे अट घालून त्याच साखर कारखान्यांना दुप्पट तिप्पट गाळप क्षमता वाढवून देत असताना साखर संघ मुग गिळून गप्प होते. राज्यातील ऊस वाहतूकदार मुकादमांच्या फसवणुकीत संकटात सापडला असताना त्या प्रश्नात कधी लक्ष घालावासे वाटले नाही, राज्यातील साखर कारखान्यांचा कधीही कॅास्ट ॲाडिट करावे असे वाटले नाही. मात्र शेतक-यांच्या बाजूने निकाल लागणार हे लक्षात आल्यानंतर आज हस्तक्षेप याचिकेवर म्हणने सादर करण्यास वेळ मागून उस उत्पादक शेतक-यांच्या ताठात माती कालविण्याचे काम सुरू केल्याचे शेट्टी म्हणाले.
निकाल शेतकऱ्यांच्याच बाजूने लागणार, राजू शेट्टींना विश्वास
दरम्यान, आज राज्य साखर संघाने तीन वर्षानी हस्तक्षेप याचिकेवर म्हणने मांडण्यास मुदत मागितल्यानंतर ॲड. योगेश पांडे यांनी त्यास विरोध केला. राज्य साखर संघाच्या कारभारावर मा. उच्च न्यायालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ऊपस्थित केला. जरी राज्य सरकार , साखर कारखानदार व राज्य साखर संघ हे सर्वजण मिळून शेतकऱ्यांच्या विरोधात कटकारस्थान करत असले तरी येत्या मंगळवारी या सुनावणीचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागणार असल्याचा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

